
मुलींमध्ये होरायझन, र. ज. चव्हाण,केंद्रीय विद्यालय तर मुलांमध्ये लिटिल ऍंजल, केंद्रीय आणि के. टी. एच. एम. यांना विजेतेपद.
नाशिक दिनांक १९ सप्टेंबर : यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे दिनांक १६ ते १८ सप्टेंबर, २०२६ दरम्यान ३८ व्या खुल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पावसामुळे सर्व गटांचे अंतिम सामने आज दिनांक १९ रोजी पार पडले.
१४ वर्षे मुलीमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात नाशिकरोडच्या र. ज. चव्हाण संघांचा अटीतटीच्या लढतीत २-१ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. या गटात एस्पालियर संघाने तिसरा क्रमांक मिळविला. १७ वर्षे मुलीच्या गटात सर्व सामने अत्यंत चुरशीची झाले. होरायझन स्कुल विरुद्ध र. ज. चव्हाण यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिला सेट र. ज. चव्हाण संघाने जिंकून आघाडी घेतली. परंतु नंतरचे दोन सेट होरायझन संघाने जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले. या गटात केंद्रीय विद्यालय संघाना तिसरा क्रमांक मिळाला. १९ वर्षे मुलीच्या गटातही चुरस दिसून आली. या गटाच्या अंतिम सामन्यात र. ज. चव्हाण संघाने उत्तम खेळ करून होरायझन संघाला २-१ असे पराभूत करून विजेतेपद मिळविले. या गटात के. टी. एच. एम. संघाने तिसरा क्रमांक मिळविला.

मुलांच्या विभागात १४ वर्षे गटात केंद्रीय विद्यालय संघाने अंतिम सामन्यात मालेगावच्या लिटिल ऍंजल संघावर विजय मिळवून विजेतेपद मिळविले. तर भोसला स्कुलच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला. मुलांच्या १७ वर्षे गटात मालेगावच्या लिटिल ऍंजल संघाने सुंदर खेळ करून नाशिकच्या सेंट लॉरेन्स संघाचा २-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. या गटात सिडकोच्या टी. जे. स्कुलच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला. मुलांच्या १९ वर्षे गटात गोखले कॉलेज, ओझर विरुद्ध के. टी. एच. एम. यांच्यात अत्यंत चुरशीच्या खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पहिला सेट के. टी. एच. एम. संघाने २६-२४ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये गोखले कॉलेजच्या खेळाडूंनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय राखत दुसरा सेट २५-१८ असा जिंकून बरोबरी केली. त्यानंतर निर्णायक सेटमध्ये गोखले संघाने ८-६ अशी आघाडी मिळविली. परंतु त्यानंतर के. टी. एच. एम.च्या खेळाडूंनी संयमाने खेळ करत ९-९ अशी बरोबरी साधली. त्यानंतरही त्यांनी हीच लय कायम ठेवत हा निर्णायक सेट १५-१३ असा जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावले. या गटात केंद्रीय विद्यायाल संघाने तिसरा क्रमांक मिळविला.

या स्पर्धेत सर्व गटांमध्ये उत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवनात आले. यामध्ये मुलीच्या गटात रसिका शिंदे, नव्या पाटील, अवनी कांबळे, आरोही वराडे, स्वार गायकवाड आणि जान्हवी ढोकणे यांचा समावेश होता. तर मुलांच्या गटात निल नीरज निकम, राजीव पाटील, नितीन वाघमारे आणि अविनाश शिरसाठ यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. सर्व गटाच्या खेळाडूंना यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, विजय खरोटे, राजेंद्र शिंत्रे, आनंद खरे, चंद्राकांत बर्वे, कीर्तिकुमार गहानकरी, प्रमोद, जाधव, बाळासाहेब भडके, आनंद खरे, अविनाश खैरनार यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, राजू शिंदे, मंदार देशमुख, राहुल आव्हाड आदी मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ,
हे या स्पर्धेचे ३८ वे वर्ष असून विविध गटातील खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळायला मिळावे आणि या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळात प्रगती साधावी हा या स्पर्धा आयोजनामागील हेतू आहे असे दीपक पाटील यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद खरे, अविनाश खैरनार, किरण उमेश सेनभक्त यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत व्यायाम शाळेच्या वरिष्ठ खेळाडूंनी परिश्रम घेतले.

सामन्याचे अंतिम निकाल :-
१४ वर्षे मुले : १) केंद्रीय विद्यालय,ओझर, २) लिटिल एन्जल. मालेगांव, ३) भोसला स्कुल, नाशिक.
१७ वर्षे मुले : १) लिटिल एन्जल. मालेगांव, २) सेंट लॉरेन्स स्कुल, नाशिक, ३) टी. जे. चव्हाण स्कुल.
१९ वर्षे मुले : १) के. टी. एच. एम. कॉलेज, २) गोखले स्कुल, ओझर, ३) केंद्रीय विद्यालय,ओझर.
१४ वर्षे मुली : १) केंद्रीय विद्यालय, ओझर, २) र. ज. चव्हाण , नाशिकरोड, ३) एस्पालीयर.स्कुल, नाशिक
१७ वर्षे मुली : १) होरायझन स्कुल, नाशिक २) र. ज. चव्हाण, नाशिकरोड, ३) केंद्रीय विद्यालय, ओझर.
१९ वर्षे मुली : १) र. ज. चव्हाण , नाशिकरोड, २) होरायझन स्कुल, नाशिक ३) के. टी. एच. एम. कॉलेज.
उत्कृष्ट खेळाडू :- मुले – निल , निरज निकम, राजीव पाटील, नितीन वाघमारे, अविनाश शिरसाठ
उत्कृष्ट खेळाडू :- मुली – रसिका , नव्या पाटील, अवनी कांबळे, आरोही वराडे, जान्हवी ढोकणे, स्वरा गायकवाड.

