
शब्दांच्या सुगंधाने जळगावची साहित्यनगरी दरवळणार
प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या ‘गाव-शिवारातल्या कविता’ आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’ या दोन काव्यसंग्रहांचे ८ ऑक्टोबर रोजी प्रकाशन
निलेश बावा
तालुका प्रतिनिधी अमळनेर
जळगाव : मातीशी नाळ जोडलेल्या गाव-शिवारातील जगण्याचे प्रतिबिंब, मानवी भावभावनांची स्पंदने आणि सामाजिक वास्तवाचे संवेदनशील भान शब्दबद्ध करणाऱ्या प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या साहित्यविश्वातील दोन नव्या काव्यकृतींचा शब्दसोहळा जळगावमध्ये रंगणार आहे. ‘गाव-शिवारातल्या कविता’ आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’ या दोन काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) निवृत्त अधिकारी, साहित्यिक आणि कवी म्हणून परिचित असलेल्या प्रा. डॉ. दशरथ साळुंखे मुळ मारवड गावाचे रहिवासी असून यांच्या लेखणीतून साकारलेल्या या दोन्ही काव्यसंग्रहांच्या प्रकाशनामुळे जळगावच्या साहित्यिक वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन स्थानकाजवळील हॉटेल रिगल पॅलेस येथे सकाळी १०.३० वाजता हा साहित्यिक सोहळा संपन्न होणार आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक तथा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाएटचे निवृत्त प्राचार्य तथा माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक अशोक नीळकंठ सोनवणे आणि कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे हे दोन्ही काव्यसंग्रह उलगडून दाखवित त्यांच्या साहित्यिक आशयाचे विवेचन करणार आहेत.
या साहित्यिक पर्वाला मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार असून, अहिराणी साहित्यिक प्राचार्य डॉ. बापूराव देसाई, डाएटचे विद्यमान प्राचार्य डॉ. अनिल झोपे, खिरोदा येथील प्राध्यापक तथा क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भूकन, कविवर्य डॉ. अशोक कौतिक कोळी आणि अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘गाव-शिवारातल्या कविता’ या शीर्षकातूनच गावकुसाबाहेरील आणि गावकुसातील जीवनाचा स्पर्श जाणवतो. ग्रामीण मातीशी जोडलेली माणसं, त्यांचे सुख-दुःख, नातीगोती, संघर्ष, श्रम आणि जगण्यातील विविध रंग यांचे प्रतिबिंब कवितेतून उमटण्याची अपेक्षा या संग्रहाकडून व्यक्त होत आहे.
तर ‘शब्दधन वाटू जनलोका’ या काव्यसंग्रहाच्या शीर्षकातच शब्दांना समाजाशी जोडण्याची भूमिका अधोरेखित होते. शब्द हे केवळ अभिव्यक्तीचे साधन न राहता समाजाच्या संवेदना जागविणारे आणि विचारांना दिशा देणारे माध्यम ठरावेत, अशी साहित्यिक भूमिका या शीर्षकातून अधोरेखित होते.
शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिल्यानंतर साहित्य क्षेत्रातही आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या या दोन काव्यसंग्रहांमुळे त्यांच्या साहित्यप्रवासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय वाचकांसमोर येणार आहे.
एका मंचावर ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कवी आणि साहित्यप्रेमींची उपस्थिती लाभणार असल्याने हा प्रकाशन सोहळा जळगावच्या साहित्यिक वातावरणाला समृद्ध करणारा ठरणार आहे. नव्या साहित्यकृतींचे स्वागत करण्यासोबतच साहित्य, शिक्षण आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करणारा हा सोहळा ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शब्दांच्या या साहित्यिक मेजवानीस साहित्यप्रेमींची उपस्थिती लाभावी, नव्या काव्यकृतींच्या प्रवासाचे साक्षीदार व्हावे आणि कवीच्या साहित्यिक वाटचालीला शुभेच्छांचा शब्दसुमनांनी गौरव करावा, असे आवाहन प्रा. डॉ. दशरथ साळुंखे व स्नेहीजन मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

