
अंदरसूल: फलंदाज के एल राहुल सोबत अंदरसूल येथील शुभम जाधव
अंदरसुल ; अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनतीच्या जोरावर क्रिकेटच्या मैदानात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अंदरसुल येथील युवा क्रिकेटपटू शुभम जाधव याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शुभमने सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर वेगवान गोलंदाज म्हणून नाशिकच्या क्रिकेट वर्तुळात आपले स्थान निर्माण केले असून, त्याची नाशिक जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली आहे.
शुभम जाधव गेल्या सुमारे ११ वर्षांपासून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. नाशिकचे प्रशिक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या गोलंदाजीतील वेग,अचूक टप्पा आणि स्विंगवर विशेष मेहनत घेतली.प्रतिकूल परिस्थितीतही सरावात सातत्य ठेवत शुभमने आपल्या खेळात लक्षणीय सुधारणा घडवून आणली.
शुभमच्या गोलंदाजीतील गुणवत्ता पाहून प्रशिक्षक शरद इंगळे यांनी त्याला मुंबईतील एमआयजी क्रिकेट क्लब येथे सरावाची संधी मिळवून दिली. याच ठिकाणी त्याची भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल यांच्याशी भेट झाली.अवघड विकेटवर शुभमने राहुलसमोर तब्बल सहा षटके गोलंदाजी केली.त्याचा वेग,अचूक टप्पा आणि बाऊन्स पाहून राहुल यांनी शुभमच्या गोलंदाजीचे कौतुक केले.सरावानंतर राहुल यांनी शुभमला जवळ बोलावून त्याच्या गोलंदाजीतील सकारात्मक बाबी सांगितल्या. विशेषतः चेंडू टाकताना अनावश्यक शॉर्ट किंवा बाऊन्सरवर भर न देता पुढे टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या मार्गदर्शनामुळे शुभमच्या गोलंदाजीत आणखी सुधारणा करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळाली.प्रशिक्षक शरद इंगळे यांनी शुभमच्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्याच्या सरावाची दिशा अधिक काटेकोर केली. दिवस-रात्र सराव,फिटनेस आणि गोलंदाजीतील बारकाव्यांवर विशेष भर देण्यात आला. त्याच्या मेहनतीला आता नाशिक जिल्हा संघातील निवडीच्या रूपाने महत्त्वाचे यश मिळाले आहे.
“शुभमकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेग आणि शिस्त आहे. आगामी काळात त्याला योग्य संधी मिळाल्यास भारतीय क्रिकेटसाठी तो प्रभावी वेगवान गोलंदाज ठरू शकतो,” असा विश्वास प्रशिक्षक शरद इंगळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, “शेतकरी कुटुंबातून आलो असलो तरी मेहनतीच्या जोरावर देशासाठी क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी सातत्याने सराव करून स्वतःला सिद्ध करणार,” अशी प्रतिक्रिया शुभम जाधव याने व्यक्त केली.
अंदरसुलच्या मातीतून सुरू झालेला शुभमचा क्रिकेट प्रवास आता नाशिक जिल्हा संघापर्यंत पोहोचला असून, त्याच्या या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळत आहे.

