
धर्मध्वज पूजन व प्रतिमापूजनाने स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाला अभिवादन; संभाजीराजांच्या शौर्यस्मृतींना नमन.
तुळापूर, दि. २२ :
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेची प्रेरणा घेऊन श्री दशनाम गोसावी समाज संस्था, सिन्नर यांच्या वतीने आयोजित शंभूतीर्थ तुळापूर ते शिवतीर्थ रायगड अभिवादन यात्रा काल सिन्नरहून निघाली. आज शंभूतीर्थ तुळापूर येथून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. धर्मध्वजा पूजन, प्रतिमापूजन आणि छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन, संगमेश्वर अभिषेक पूजन करून यात्रा पुढे निघाली. तूळापूर येथे सिन्नर येथील श्री दशनाम गोसावी समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभी धर्मध्वजा पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष भैरवनाथ गोसावी यांच्या हस्ते, महंत निश्चलपुरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सुभाषपुरी गोसावी, आद्यगुरू शंकराचार्यांच्या प्रतिमेचे पूजन ब्रह्मगिरी गोस्वामी, तर द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेचे पूजन गुलाबगिरी गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सरचिटणीस वसंत गोसावी यांनी शंभूतीर्थ तुळापूरच्या इतिहासाचे व महत्त्वाचे विवेचन केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील पराक्रम, स्वराज्याप्रती असलेली अढळ निष्ठा आणि धर्म-संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान यांचा इतिहास उपस्थितांसमोर उलगडण्यात आला.
“स्वराज्य केवळ तलवारीच्या धारेवर उभे राहिले नाही, तर त्यामागे असंख्य मावळ्यांचा त्याग, छत्रपती संभाजी महाराजांचे असीम शौर्य आणि स्वराज्याशी अखंड निष्ठा होती. तुळापूरची माती आजही त्या बलिदानाची साक्ष देत असून, येथून रायगडाकडे निघालेली ही यात्रा इतिहासाची केवळ पुनरावृत्ती नसून नव्या पिढीला स्वराज्याच्या विचारांची मशाल देणारी आहे,” अशा भावनेतून शंभूराजांना अभिवादन करण्यात आले.ज्या भूमीत शंभूराजांच्या बलिदानाची वेदना इतिहासाने जपली, त्याच भूमीतून रायगडाच्या स्वराज्याच्या राजधानीकडे निघालेली ही यात्रा म्हणजे त्यागापासून शिवराज्याभिषेकापर्यंतच्या स्वराज्यगाथेला केलेले अभिवादन आहे.
शंभूतीर्थ तुळापूर येथे अभिवादन केल्यानंतर शिवस्तुती व द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पठण करत संगमेश्वर महादेवाचा अभिषेक करण्यात आला. यानंतर अभिवादन यात्रा रायगडाकडे मार्गस्थ झाली. आज २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी रायगड पूजन व २४ सप्टेंबर रोजी रायगडावर होणाऱ्या द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळ्यात संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तुळापूर येथील छत्रपतींच्या बलिदानभूमीपासून रायगडाच्या स्वराज्य भूमीपर्यंतचा हा प्रवास शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठेची अखंड प्रेरणाज्योत पुढे नेणारा ठरणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी, खजिनदार छगन गोसावी, कार्यकारणी सदस्य गुलाबगिरी गोसावी, शरद गोसावी, विजय गोसावी, माजी अध्यक्ष रवींद्र गिरी, अशोक गोसावी, संदीप गोसावी, बाळासाहेब गोसावी, ब्रम्हगिरी गोस्वामी, लालाभाऊ मुत्रक, विशाल जाधव आदी उपस्थित होते. “तुळापूरची माती बलिदानाची, तर रायगडाची माती स्वराज्याची; या दोन्ही पवित्र भूमींना जोडणारी ही अभिवादन यात्रा म्हणजे इतिहासाला नमन आणि भविष्याला प्रेरणा देणारी स्वराज्याची ज्वलंत मशाल आहे.” असे मत वसंत गोसावी यांनी व्यक्त केले.

