
मुळडोंगरी : (प्रतिनिधी ) सरस्वती माध्यमिक विद्यालय, मुळडोंगरी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा व नागरिकत्व या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना रस्त्यावर वावरताना घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन तसेच जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे नेतृत्व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बोरसे मॅडम यांनी केले. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, वाहतूक सिग्नलचे पालन करणे, वाहन चालविताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आदी बाबींविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबरोबरच शिस्त, संयम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. “सुरक्षित रस्ता, सुरक्षित प्रवास आणि जबाबदार नागरिक” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रस्ता सुरक्षा व नागरिकत्वविषयक नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त, नागरिकत्वाची जाणीव आणि रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण झाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच मुख्याध्यापिका शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

