
नाशिक / अहिल्यानगर – समकालीन प्रकाशन, पुणे यांच्याकडून दरवर्षी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाकडे देणगी स्वरूपात पुस्तक संच पाठवले जातात. एका शाळेसाठी दोन संच दिले जातात – एक संच विद्यार्थी वाचनालयासाठी व दुसरा संच शिक्षक वाचनालयासाठी. एका संचात १३ ते १४ पुस्तके असतात.
विद्यार्थ्यांसाठी गोष्टीरुपात अनुभवी लेखकांची पुस्तके तयार केली जातात, तर शिक्षकांसाठी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या अनुभव कथनावर आधारित पुस्तके असतात. एका शाळेला अंदाजे १५,००० रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून दिली जातात.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे सचिव व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक श्री. एस. बी. देशमुख यांच्याकडे दरवर्षी ५० संच पाठवले जातात. त्यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून आदिवासी व ग्रामीण भागातील गरजू शाळांना हे संच प्रामाणिकपणे वाटप केले जात आहेत.
काल डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे औचित्य साधून श्री. देशमुख यांच्या हस्ते पोहेगाव येथील श्री. ग. र. औताडे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास हे पुस्तक संच भेट देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मोठी मदत होत आहे.

