
सिन्नर (प्रतिनिधी )आज आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत, परंतु अजूनही आपल्या समाजातील अंधश्रद्धा नष्ट झालेल्या नाहीत. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये जी काही बाबा बुवांची प्रकरणे उघडकीस आली आहे त्यावरून तर असे लक्षात येते की, उच्चशिक्षित माणसेही अंधश्रद्धांच्या विळख्यात गुरफटलेले आहेत. अशावेळी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांची आवश्यकता आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ही जबाबदारी घेऊन आपल्या कुटुंबात, समाजात आणि गावागावांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादाची जाणीव जागृती करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी सिन्नर महाविद्यालयात केले.
म वि प्र संचलित सिन्नर येथे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २४ सप्टेंबर हा दिवस “राष्ट्रीय सेवा योजना दिन” म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. ठकसेन गोराणे बोलत होते. यावेळी त्यांनी बुवा, बाबा चमत्कारांच्या नावाखाली समाजाची कशी दिशाभूल करून फसवणूक करतात याचेही प्रात्यक्षिक काही प्रयोगांच्या माध्यमातून करून दाखवले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उप प्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ललित कळसकर, डॉ. दत्तात्रय वेलजाळी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. आर. एम. आंबेकर, स्तंभ लेखक प्रा. प्रभाकर चतुर, सुनील कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांनी आधुनिक भारताच्या विकासामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन असलेल्या युवकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. अजूनही आपण विकसित देशांच्या यादीपर्यंत पोहोचलेलो नाहीत, कारण जुन्या रूढी- परंपरा आणि अंधश्रद्धा अजूनही आपल्या समाजात रुतून बसलेल्या आहेत. या सर्वांपासून समाजाला मुक्त करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांनी घ्यायला हवी असे सांगितले. प्राचार्य पुढे म्हणाले की, पुढील वर्षी आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विजन्म शताब्दी साजरी करत आहोत. त्याचे औचित्य साधून रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांना दूर करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करू या.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा स्वयंशिस्त असलेला, विवेकवादी विचारांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारलेला असतो. कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करतो. आमच्यासारख्या अनेक लोकांची जडणघडण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनच झालेली आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय वेलजाळी यांनी केले, तर आभार मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. ललित कळसकर यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

