
नाशिक: प्रादेशिक कादंबरी लेखन हे त्या त्या प्रदेशातील पार्श्वभूमी, येथील लोकजीवन, बोलीभाषा, व्यवसाय, संस्कृती आणि वैचारिक परिवर्तन इ. वर्णन असते. तेथील लोक जीवनाचा अनुभव आणि मनोहरवाडी कादंबरी यांचे नाते एकरुप झालेले आहे. कादंबरीतील पात्र आणि प्रसंग काल्पनिक असले तरी प्रदेश हा वास्तव आहे. प्रादेशिक कादंबरी लेखनाचा उद्देश केवळ वर्णन नसून तेथील माणसांचे जगणे, त्यांचे प्रश्न, वेदना, व्यथा व मानवी संवेदना मांडलेल्या आहेत. पोंभूरणा तालुक्यात मनोहरवाडी नावाचे कोणतेही गाव अस्तित्वात नव्हते, आजही नाही. मनोहरवाडी हे गाव लेखकाच्या कल्पनेतील असले तरी त्यातील कथानक मात्र इतरत्र कुठेही घडताना दिसते.

पात्र, प्रसंग समाजात आजही अनुभवायला मिळतात. कादंबरीतील किशोर, अशोक आणि सपना यांच्या प्रेमाची नि त्यागाची अनोखी गाथा असल्याचे प्रतिपादन कवी कादंबरीकार अनिल मनोहर यांनी हुतात्मा स्मारक नाशिक येथे गिरण्या गौरव प्रतिष्ठान आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रमात तीनशे पाचवे पुष्प गुंफताना मनोहरवाडी या कादंबरीवर बोलत होते. अध्यक्षस्थान म्हणून कवी अशोक भालेराव होते.
अनिल मनोहर यांच्या दत्तकपुत्र, विसंबा, पायपीट या कादंबर्या तर सूर्योदय निळा होत आहे, शब्दांचा लाॅगमार्च, किरणांचा सत्याग्रह, प्रकाशाचे नवे गाव हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. कवयित्री अलका दराडे आणि प्राचार्य के.मा. मोरे यांना भाग्यवान ग्रंथ भेट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाहीर सुरेशचंद्र आहेर, प्रा. गंगाधर आहिरे, प्रा. निशांत गुरु, कवी काशिनाथ वेलदोडे, गझलकार तु.सी.ढिकले, माधवराव गिरी आदी कवी साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अशोक कुमावत यांनी केले तर योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार व्यक्त केले.

