
नाशिक, दि. २४ सप्टेंबर २०२६ : के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, नाशिक येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात कु. समृद्धी रुकारी हिच्या स्वागतगीताने, तर त्यानंतर संस्थागीताने झाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनी कु. साक्षी नगलकर हिने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संजीव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा दाखला दिला. “एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला” या अभंगातील विचार स्पष्ट करताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी एखादी कला अथवा कौशल्य असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांना व कौशल्यांना विकसित करून त्यांचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. व्ही. एम. सेवलीकर, विश्वस्त व समन्वयक होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी मा. अजिंक्य वाघ, जनसंपर्क संचालक, के. के. वाघ शिक्षण संस्था हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमास *उपप्राचार्य डॉ. अनुराधा नांदुरकर, विभागप्रमुख डॉ. अर्चना बेंडाळे, प्रा. अर्चना कोते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी *प्रा. मयूर उशीर* यांनी आभार प्रदर्शन केले.

