
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘नशामुक्त युवा’ हा जनजागृतीपर कार्यक्रम २३ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुरेश नारायणे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. नशेचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून आपल्या शिक्षणाकडे व उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील होते.

अध्यक्षीय मनोगतात त्यांनी आजच्या तरुणाईमध्ये वाढत असलेल्या मोबाईलच्या अतिवापराच्या समस्येकडे लक्ष वेधले. मोबाईलचा वापरही एका प्रकारच्या व्यसनात रूपांतरित होऊ शकतो, असे सांगून मोबाईलचा वापर केव्हा, किती आणि कोणत्या कारणासाठी करावा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. बी. एम. अहिरे यांनी प्रास्ताविकातून ‘नशामुक्त युवा’ अभियानाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. के. पवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक प्रा. एम. बी. आटोळे, वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक अधिकारी प्रा. आर. वाय. वाघ, श्रीमती कडलग मॅडम, प्रा. पैठणकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

