
पेठ (नाशिक) / प्रतिनिधी :
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील पळशी (गावंध) येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि ग्रामपंचायत गावंध यांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारणासाठी ‘यशवंत वनराई बंधारा’ उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. “पाणी अडवा, पाणी जिरवा – हिरवी ग्रामसंस्कृती घडवा” हा संदेश देत राबवलेल्या या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली झाले. श्री. धनराज वसंत ठाकरे (लोकनियुक्त सरपंच, पळशी गावंध) यांच्या विशेष पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली हा वनराई बंधारा पूर्णत्वास आला असून, या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी श्री. आप्पासाहेब शिंदे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती पेठचे गटविकास अधिकारी श्री. जे. टी. सूर्यवंशी लाभले होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजक म्हणून ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलाश मोरे, राष्ट्रीय सेवा योजनांचे संचालक प्रा. राजेंद्र वाघ, यंग रिसोर्स ब्रिगेड फाऊंडेशनचे संचालक श्री. राज महेश हिरे आणि समस्त ग्रामस्थ पळशी (गावंध) यांनी सहभाग घेतला.
या महत्त्वपूर्णप्रसंगी लोकनियुक्त सरपंच धनराज ठाकरे यांच्या विशेष पुढाकारासोबतच शिक्षक पृथ्वीराज राठोड, पंडित महाले, जीवन चौधरी, ग्रामविकास अधिकारी पखाने भाऊसाहेब, ओंकार जाधव, बारे साहेब, तलाठी मॅडम, राहुल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसंधारणासाठी लोकसहभाग आणि निसर्ग संवर्धनाच्या या उपक्रमाने परिसरातील नागरिकांमध्ये पाण्याच्या बचतीबाबत मोठी जनजागृती निर्माण केली असून, उपस्थितांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

