
नाशिक- येथील प्रसिद्ध सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या अवघ्या सात वर्षीय चिमुकल्या कुमारी आर्वी गौतमी राहुल पगारे हिने आपल्या अप्रतिम कलागुणांच्या जोरावर राज्यस्तरावर नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे. मुंबई येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानल्या जाणाऱ्या ‘नेहरू आर्ट गॅलरी’मध्ये आयोजित ‘बालदिशा’ या राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनासाठी तिच्या चित्रांची निवड झाली आहे. अवघ्या दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला हा दुर्मिळ बहुमान मिळाल्यामुळे कलाक्षेत्रात तिचे मोठे कौतुक होत आहे.

आर्वीचे वडील राहुल पगारे हे स्वतः सिद्धहस्त चित्रकार असल्याने तिला कलेचा आणि कुंचल्याचा समृद्ध वारसा घरातूनच लाभला आहे. अगदी लहान वयापासूनच रंगांशी आणि रेषांशी तिचे नाते जुळले असून, वडिलांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली तिच्यातील सुप्त प्रतिभेला आकार मिळत गेला. तिच्या प्रत्येक चित्रातून तिची विलक्षण कल्पकता, सूक्ष्म निरीक्षण आणि रंगांची अचूक जाण दिसून येते. एवढ्या लहान वयात तिच्या चित्तवेधक चित्रांची निवड होणे, म्हणजे तिच्यातील जन्मजात कलेचे बीज उत्तमरीत्या अंकुरल्याचेच हे स्पष्ट उदाहरण आहे.

मुंबईची ‘नेहरू आर्ट गॅलरी’ ही व्यावसायिक आणि ज्येष्ठ चित्रकारांसाठी देशभरात अतिशय प्रतिष्ठेचे व्यासपीठ मानले जाते. सामान्यतः या दालनात स्वतःच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यासाठी अर्ज केल्यानंतर चित्रकारांना प्रदर्शनाची तारीख मिळण्यासाठी तब्बल दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. मात्र, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १४ नोव्हेंबर रोजी असणाऱ्या बालदिनाच्या जयंतीनिमित्त नेहरू सेंटरतर्फे दरवर्षी बालगटातील चिमुकल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे विशेष प्रदर्शन विनामूल्य भरविले जाते. या प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शाळांतून हजारो चित्रे मागवली जातात. तज्ज्ञ परीक्षकांकडून होणाऱ्या अत्यंत काटेकोर आणि चुरशीच्या निवड प्रक्रियेतून आर्वीच्या चित्रांची निवड झाली असून, तिला एवढ्या कमी वयात ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
सदर ‘बालदिशा’ चित्रप्रदर्शन येत्या ११ नोव्हेंबरपासून नेहरू सेंटर, वरळी (मुंबई) येथे सुरू होणार असून पुढील सात दिवस रसिकांसाठी ते खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईतील कलाप्रेमींना नाशिकच्या या चिमुरड्या चित्रकर्तीची कलाकृती अनुभवता येणार आहे.
आर्वीच्या या अभूतपूर्व यशामुळे सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलच्या मॅनेजर रेव्हरन्स सिस्टर थेरेसा जॉर्ज, मुख्याध्यापिका रेव्हरन्स सिस्टर टेसी अँटो, उप-मुख्याध्यापिका रेव्हरन्स सिस्टर टीना, कला शिक्षक श्री. सिद्धेश मालवीय, कु. शामलता राठोड, वर्गशिक्षिका सौ. शीतल पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून तिच्या पुढील कलाप्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. चिमुरड्या आर्वीच्या या यशामुळे पगारे कुटुंबासह संपूर्ण नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

