
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४३७ वा दिवस

मानवामध्ये जे काही शक्तिमान व शुभ असे दिसून येते ते त्या दिव्यत्वाचाच परिणाम होय. चांगुलपणा, शुभ वर्तन या गोष्टी आपल्याला दिसतात, त्या प्रत्येकाच्या आत असलेल्या दिव्यत्वाचा (Divine Spark) अंश आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे दिव्यत्व उपजतच सामावलेले असते. हे दिव्यत्व बहुसंख्य लोकांत सुप्त अवस्थेत व्यक्त झालेले नसले तरी माणसामाणसांमध्ये मूलतः कोणताही भेद नाही, कारण सगळ्यांचेच स्वरूप मूलतः दिव्य आहे. जणू काही एक अनंत महासागर आपणा सर्वांच्या मागे असून तुम्हीआम्ही सर्वचजण त्याच्या पृष्ठभागावरील लाटा आहोत, आणि आपल्यापैकी प्रत्येकजण ते अनंत अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून स्वरूपतः प्रत्येकाचा त्या सच्चिदानंदरूपी महासागरावर जन्मसिद्ध अधिकार आहे; आणि आपल्यामध्ये जो भेद आहे तो त्या दिव्यत्वाची वा ईश्वरत्वाची अभिव्यक्ती करण्याच्या आपल्या कमीअधिक क्षमतेमुळेच निर्माण झालेला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास ६ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २८ ऑक्टोबर २०२६ ★ १६३६ अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची स्थापना
★ १८६७ स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, मूळच्या आयरिश मागरिट एलिझाबेथ नोबल उर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्मदिन.
“विकसित व्हावे अर्पित होऊन जावे” याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिता यांचे स्फूर्तीदायी चरित्र ! भगिनी निवेदिता हे नाव उच्चारताच त्यांनी भारतात केलेल्या लोकविलक्षण कार्य, त्यांचा असिम त्याग, संपूर्ण समर्पणता आपल्या देशवासीयांप्रती असलेली अपार करुणा आणि त्यातून उभे राहणारे लोकसेवेचे उत्तुंग कार्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यांनी महिला शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रात तर मोठं कार्य केले. त्यांची बुद्धिमत्ता, हिंदू धर्मावरील व भारतावरील निष्ठा, ध्येयवादी वृत्ती आदी गुणविशेषांमुळे त्या भारतीयांच्या कायमच्या आदरास पात्र ठरल्या आहेत.
★ १९०० जर्मन विचारवंत मॅक्समुल्लर यांचा स्मृतीदिन
★ १९५५ मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा जन्मदिन
★ आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन.

