
येवला (प्रतिनिधी ): येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्रसिद्ध कवी, लेखक तथा समीक्षक प्रशांत वाघ यांना नुकताच श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान , श्री क्षेत्र आपेगाव यांच्याकडून देण्यात येणारा यावर्षीचा ज्ञानरत्न पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.

साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची व साहित्यिक योगदानाची दखल घेऊन यावर्षी ज्ञानरत्न पुरस्कार २०२६ करिता येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्रसिद्ध कवी, लेखक तथा परीक्षक प्रशांत वाघ यांना जाहीर झाल्याचे संस्थेच्या वतीने लेखक संदीप राक्षे यांनी निवडपत्राव्दारे कळविले आहे.
कवी प्रशांत वाघ हे जिल्ह्यातील नामवंत कवी असून ते साहित्य कलाकृती समीक्षक आहेत. त्यांनी आजपावेतो कविता संग्रह, कथा संग्रह, कादंबरी, ललित लेख, अशा जवळपास तीनशेच्यावर साहित्य कलाकृतींचे परीक्षण केले आहे. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान पिंपळगाव जलाल यासंस्थेचे सदस्य असून संस्थेच्या माध्यामातून दरवर्षी साहित्य संमेलन भरवून राज्यभरातील साहित्यिकांच्या कलाकृतींना पुरस्कार दिले जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञान, साहित्य आणि सामाजिक, मानवतावादी विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी संस्थेच्या वतीने साहित्यिकांना दिला जातो.
संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान, श्रीक्षेत्र आपेगाव यांच्या वतीने दरवर्षी “संत ज्ञानोबाराय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे साहित्य संमेलन दि २४ नोव्हेंबर २०२६ रोजी श्रीक्षेत्र आपेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात कवी प्रशांत वाघ यांना ज्ञानरत्न पुरस्कार २०२६ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कवी प्रशांत वाघ यांच्या निवडीचे लेखक संदीप राक्षे, विजय पोहनेरकर, अलका बोर्डे, अश्विनी वाकणकर, शांताराम गायकवाड, संजय वाघ, तेजस वाघ, प्रणित वाघ, प्रणिल वाघ, बाळासाहेब गिरी, आदींनी अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन गझलकार राम गायकवाड, मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार, कवी संजय कावरे, कवी गणेश सांगुनवेढे, कवी विलास पंचभाई, कवी डी जे भुसारे, कवयित्री स्नेहल येवला, कवी रवींद्र काळे, डॉ.राम शिंदे, कवी सुहास टिपरे आदींनी केले आहे.

