
नाशिकला आलो होतो. पळसेहून जाखोरीकडे मधल्या रस्त्याने जात असताना रस्त्यालगत शेतात ह.भ.प. समाधान गायधनी काम करताना दिसले. गाडी थांबवली… शेताच्या बांधावर थोड्या गप्पा रंगल्या.
निघताना त्यांनी अगदी आपुलकीने शेतातली ताजी वांगी, मिरच्या आणि इतर भाजीपाला ‘वानूळा’ म्हणून सोबत दिला.
पूर्वी आपल्या ग्रामीण संस्कृतीत ‘वानवळा’ किंवा बोलीभाषेतील ‘वानूळा’ देण्याची एक सुंदर परंपरा होती. आपल्या शेतात पिकलेलं, घरात तयार झालेलं काहीतरी पाहुण्याच्या हातात देऊनच त्याला निरोप द्यायचा. त्यामागे व्यवहार नव्हता; होती ती आपुलकी, मैत्री, माणुसकी आणि ‘आपल्याकडचं थोडं त्याच्या घरातही जावं’ ही निर्मळ भावना.
आज बाजारातून कितीही उत्तम भाजी विकत घेता येईल; पण मित्राच्या शेतातून प्रेमाने मिळालेल्या त्या चार मिरच्या आणि दोन वांग्यांची किंमत पैशांत मोजता येत नाही.
आणि तो वानूळा घरी घेऊन जाणं… त्याची भाजी करून घरच्यांसोबत खाणं… याचा आनंदच काही वेगळा !
काही परंपरा हातात फक्त काही वस्तू देत नाहीत…
त्या सोबत आपुलकीची ऊब आणि नात्यांचा गोडवा देऊन जातात.
Regards,
सुहास खाडे
75072 62040

