
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल जनता विद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन अरुण सूर्यवंशी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक स्वीकारताना. समवेत मार्गदर्शक शिक्षक सुनील एखंडे व विद्यार्थी. (छाया : सुनील एखंडे)
लोहोणेर ( प्रतिनिधी ): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी खासदार कै.गो.ह.देशपांडे यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.विद्यालयाचा विद्यार्थी अर्जुन अरुण सूर्यवंशी याने ‘मूल्यशिक्षण काळाची गरज’ या विषयावर प्रभावी व ओघवत्या शैलीत वक्तृत्व सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला.नाशिक येथील पेठे विद्यालयात झालेल्या या स्पर्धेत विविध विद्यालयांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अर्जुन सूर्यवंशी याच्या प्रभावी मांडणीला परीक्षकांनी दाद देत त्याची द्वितीय क्रमांकासाठी निवड केली. प्रमुख पाहुणे प्रा.अविनाश बल्लाळ तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्याला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख ३०१ रुपये देऊन गौरविण्यात आले.
तसेच लहान गटात विद्यालयाच्या श्रावणी काकुळते,अराध्या सूर्यवंशी आणि वैष्णवी आहिरे यांनीही उत्कृष्ट व प्रभावी सादरीकण केले.या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष यशवंत शेवाळे,माता-पालक संघाच्या उपाध्यक्ष रुपाली धामणे यांच्यासह सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के,पर्यवेक्षक विलास निकम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

