
नांदगाव ( प्रतिनिधी ) : मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने 3 रा राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख प्रा. स्वप्नील शेंडगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, भारतीय अंतराळ संशोधन आणि अवकाश तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, तसेच भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय अंतराळ दिनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी चंद्रदक्षिण ध्रुवावरील सॉफ्ट लँडिंगच्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना भौतिकशास्त्र विभागाचे विद्यार्थी आदिती घोटेकर, राणी काळे, तृप्ती लोखंडे, सायली बोरसे, अश्विनी गोराडे, तृप्ती हारदे, विशाखा कवडे, ऋषिकेश गायकवाड आणि शंतनू मवाळ या विद्यार्थ्यांनी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचाल, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची भूमिका, उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि भविष्यातील विविध अंतराळ मोहिमांची उत्स्फूर्तपणे माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.
भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. राजेंद्र वाघ यांनी आपल्या मनोगतात अंतराळ मोहिमांचे महत्त्व विषद करताना अंतराळातील संशोधन व त्यामधील संधी याबद्दल मार्गदर्शन केले. “अंतराळाकडे पाहताना केवळ आकाशातील तारे पाहू नका; त्या तारांकडे पोहोचण्याचे स्वप्नही पाहा,” या प्रेरणादायी संदेशातून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील रहा असा संदेश दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताने अंतराळ क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर मिळविलेल्या यशाचा गौरव केला. चांद्रयान, मंगळयान तसेच विविध उपग्रह प्रक्षेपण मोहिमांमुळे भारताने जागतिक स्तरावर निर्माण केलेली ओळख विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी संशोधनाची दृष्टी विकसित करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विज्ञान शाखाप्रमुख डॉ. के. आर. खंदारे, प्रा. एम. बी. आटोळे, प्रा. बी. पी. मोरे, प्रा. कौतिक तांबे, प्रा. आर. टी. बिन्नर , प्रा. अंकुश लव्हाटे, प्रा. सुवर्णा शिंदे, प्रा. प्राजक्ता पाटील व 50 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी जरीफा तांबोळी व वैष्णवी शिंदे व आभार प्रदर्शन प्रा. बी. पी. गोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. केतन पाटील, श्री. मनेश बोरसे, श्री शंकर थोरात आदींनी परिश्रम घेतले.

