
▫️सिन्नर मधील ऐतिहासिक व धार्मिक महत्व असणारे नागेश्वर मंदिराचे प्राचीन नाव माहीत आहे का ?
▫️नागेश्वर मंदिर हे नाव कसे पडले या बद्दलची परंपरा माहीत आहे का ??
▫️नागेश्वर मंदिराची सेवा करणारे सिद्ध पुरुष माहीत आहे???
वरील प्रश्नांच्या उत्तरासाठी खालील लेख अवश्य वाचा
“जिथे नदीच्या प्रवाहात इतिहास वाहतो,
जिथे वृक्षांच्या सावलीत लोकश्रद्धा विसावते,
आणि जिथे भग्न दगडही एखाद्या विस्मृतीत गेलेल्या मंदिराची कहाणी सांगतात…
ते स्थान म्हणजे — सिन्नरचे प्राचीन वैजनाथ, आजचे नागेश्वर!”
सिन्नरच्या समृद्ध ऐतिहासिक वारशात नागेश्वर मंदिराचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज नागेश्वर या नावाने परिचित असलेले हे शिवस्थान
हे केवळ एक मंदिर नाही; तर यादवकालीन धार्मिक परंपरा, महानुभाव पंथाच्या स्मृती, स्थानिक लोकश्रद्धा आणि नंतर झालेल्या जीर्णोद्धाराच्या खुणा आपल्या कुशीत जपून ठेवणारे एक ऐतिहासिक स्थळ आहे.
🔱 चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थान
काळाच्या अनेक शतकांचा प्रवास करूनही या भूमीने एक महत्त्वाची आठवण आपल्या हृदयात जपली आहे.
चक्रधर स्वामींनी या मंदिराला भेट दिली आणि येथे मुक्काम केला होता.
त्या काळातील मंदिराचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख होते. शिवनदीच्या पात्राकडून मंदिराकडे येण्यासाठी पक्क्या दगडी चिऱ्यांचा घाट बांधलेला होता.
आज नदीच्या प्रवाहाकडे पाहताना कदाचित त्या काळातील दृश्य डोळ्यांसमोर उभे राहते—
शिवनदीचा शांत प्रवाह…
दगडी घाट…
मंदिराकडे जाणारी वाट…
आणि त्या वाटेने येणाऱ्या चक्रधर स्वामींच्या चरणांची स्मृती…
काळ पुढे गेला, मंदिराचे स्वरूप बदलले आणि आजचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख झाले; परंतु त्या भूमीची ऐतिहासिक स्मृती मात्र अजूनही जिवंत आहे.
🏛️ दगड बदलले… पण इतिहासाची जागा बदलली नाही!
आजचे नागेश्वर मंदिर पाहताना त्याची प्राचीनता प्रथमदर्शनी जाणवत नाही. कारण मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी सुरू आहे.
मूळ मंदिराचा मुखमंडप, सभामंडप आणि अंतराळ आज शिल्लक नाहीत.
मात्र मंदिराचे गर्भगृह ज्या जागी आहे, ती जागा प्राचीन मंदिराशी संबंधित असल्याचे अनेक संकेत मिळतात.
आणि म्हणूनच या मंदिराकडे पाहताना एक प्रश्न मनात उभा राहतो—
“आज दिसणारे मंदिर किती जुने आहे?”
त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे—
“या जागेवर उभे असलेले मूळ मंदिर किती जुने होते?”
याचे उत्तर आपल्याला मंदिराच्या परिसरात विखुरलेल्या दगडांतून मिळते.
भग्न दगड बोलतात… फक्त ऐकणारे डोळे हवेत!
मंदिराच्या पश्चिम भागात आजही काही प्राचीन स्थापत्य अवशेष विखुरलेले दिसतात—
▪️ स्तंभपाद
▪️ नक्षीदार शिखरदगड
▪️ अधस्तंभाचे शीर्षभाग
▪️ महिरपीचे नक्षीयुक्त दगड
▪️ प्राचीन पायाभरणीचे
काही दगड मातीत अर्धवट गाडलेले आहेत, तर काही सामान्य दगडांमध्ये मिसळून गेले आहेत.
घाटाच्या बाजूला कोनाड्यात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारे उजव्या सोंडेचा नृत्य गणराया शिल्प दिसून येते तसेच इतर भग्न शिल्प दृष्टीस पडतात.
प्रत्येक दगड हा एका हरवलेल्या वास्तूचा तुकडा आहे.
प्रत्येक पायाभरणीचा दगड हा एका प्राचीन मंदिराचा मूक साक्षीदार आहे.
यावरून असे जाणवते की, चक्रधर स्वामींच्या काळात या जागेवर प्राचीन शिवमंदिर अस्तित्वात होते.
नागेश्वर मंदिराचा घाट व परिसर पेशवाई काळात बांधले गेल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते.
गर्भगृह — प्राचीनतेची एक महत्त्वाची खूण
आताच्या जीर्णोधारापूर्वी नागेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भिंतींमध्ये कोनाडे आहेत. मात्र त्यांची रचना देवकोषापेक्षा पूजासाहित्य ठेवण्यासाठी केलेल्या कोनाड्यांसारखी होती.
आता जीर्णोध्दार व पुनर्बांधणी सुरू असली तरी
यातून एक गोष्ट स्पष्ट होते—
आजचे मंदिर म्हणजे मूळ मंदिराचे जतन झालेले संपूर्ण रूप नसून, प्राचीन मंदिराच्या स्मृतीवर उभे राहिलेले पुढील काळातील पुनरुज्जीवित स्वरूप आहे.
वैजनाथ ते नागेश्वर — नाव बदलले, श्रद्धा नाही!
महानुभव पंथाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी सदर मंदिर स्थानी निवास केला असल्यामुळे सदर स्थानाचे महात्म्य स्थानपोथी, लिळाचरित्रात आढळून येते.सदर ग्रंथात नागेश्वर मंदिराला वैजनाथ मंदिर म्हटले गेले आहे.तसेच
या मंदिराच्या इतिहासातील सर्वात रंजक अध्याय म्हणजे त्याच्या नावाची लोकपरंपरा.
वयोवृद्ध नागरिकांच्या कथनानुसार, या मंदिराला पूर्वी वैजनाथ म्हणूनच ओळखले जात होते.परंतु
श्रावणातील नागपंचमी आली की मंदिरात नागदेवतेची चांदीची प्रतिमा ठेवली जाते. भाविक महिला श्रद्धेने नागपूजा करतात. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.गर्भगृहात आजही भिंतीतील कोनाड्यात नागदेवतेचे सुंदर शिल्प असून भाविक भक्तिभावाने नागदेवतेची पूजा व पुष्पहार अर्पण करत असतात.
या नागपूजेच्या दीर्घ लोकपरंपरेतूनच कालांतराने वैजनाथ हे प्राचीन नाव मागे पडून ‘नागेश्वर’ हे नाव रूढ झाले, अशी स्थानिक आख्यायिका सांगते.
इतिहास आपल्याला पुरावे देतो…
लोकपरंपरा आपल्याला स्मृती देते…
आणि श्रद्धा त्या स्मृतीला आजपर्यंत जिवंत ठेवते!
सिद्धपुरुषानीं नागेश्वर मंदिराची केलेली भक्ती
स्वामी दयानंद बाबा
स्वामी दयानंद बाबा काशीवरून सिन्नर येथे आल्यानंतर बराच काळ नागेश्वर मंदिराच्या सानिध्यात वास्तव्य केले.नंतर सिन्नर नगरीतील भक्तांनी विनंती केल्यानंतर बारादारी येथे वास्तव्य केले व नंतर तिथेच समाधी घेतली.परंतु सुरवातीची काही वर्षे स्वामी दयानंद बाबा यांचे वास्तव्य ह्या मंदिरात होते यावरून या मंदिराचे धार्मिक महत्व व अधिष्ठान लक्षात येते.
🔸माधवगिरी पोळगिरी महाराज🔸
माधवगिरी पोळगिरी महाराज यांची समाधी नागेश्वर मंदिराच्या परिसरात आहे.ज्यांनी जवळपास ३५ वर्षे नागेश्वर महादेवाची सेवा केली आणि विविध धार्मिक उत्सव कार्यक्रमांना सुरुवात केली.
सदर ठिकाणी आणखीन काही सिद्धपुरुषांचे समाधीस्थळ दिसून येतात.
🌳 नदी, वृक्ष आणि मंदिर — निसर्गाच्या कुशीतले शिवस्थान
नागेश्वर मंदिराचे सौंदर्य केवळ वास्तूमध्ये नाही.
शिवनदीच्या परिसरातील शांतता, मंदिरासमोरील प्राचीन पिंपळ तसेच कडुलिंब, चंदन, बिल्व आदी वृक्षांमुळे संपूर्ण परिसराला एक आगळेच पावित्र्य लाभले आहे.
वाऱ्याची मंद झुळूक…
पिंपळाच्या पानांची सळसळ…
शिवनदीचा शांत प्रवाह…
आणि मंदिरातील शिवतत्त्वाची अनुभूती…
यामुळे नागेश्वर मंदिर म्हणजे इतिहास आणि निसर्ग यांचा विलक्षण संगम वाटतो.
म्हणूनच नागेश्वरचे महत्त्व केवळ सध्याच्या मंदिराच्या वास्तूपुरते मर्यादित नाही.
त्यामागे आहे—
महानुभाव साहित्याची साक्ष,
यादवकालीन शिवपरंपरेची स्मृती,
प्राचीन मंदिराच्या पायाभरणीच्या खुणा,
विखुरलेले स्थापत्य अवशेष,
नागपूजेची लोकपरंपरा,
निसर्गरम्य परिसर,
आणि शतकानुशतके चालत आलेली लोकश्रद्धा!
📖 एक महत्त्वाचा ऐतिहासिक विचार
सिन्नरच्या मंदिरांचा इतिहास मांडताना केवळ आज दिसणाऱ्या वास्तूवरून त्यांचे प्राचीनत्व ठरविणे योग्य ठरणार नाही.
नागेश्वर, पाताळेश्वर आणि ब्रह्मेश्वर (नारायण) यांसारख्या मंदिरांकडे पाहताना त्यांच्या सध्याच्या वास्तूपेक्षा त्यांच्या जागेची प्राचीनता, उपलब्ध साहित्यिक संदर्भ, स्थापत्य अवशेष आणि स्थानिक परंपरा यांचा एकत्रित अभ्यास करणे आवश्यक आहे.
वैजनाथ हरवले नाही…
ते नागेश्वर या नव्या नावाने आजही आपल्या श्रद्धेत जिवंत आहे!
सिन्नरच्या भूमीत अशा कितीतरी मंदिरांच्या रूपाने इतिहास श्वास घेत आहे. गरज आहे ती केवळ दर्शन घेण्याची नाही, तर त्या दगडांमागची कथा वाचण्याची, त्या परंपरांमागचा इतिहास समजून घेण्याची आणि हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जतन करून पोहोचविण्याची.
सिन्नरचा इतिहास केवळ पुस्तकात नाही…
तो नदीच्या प्रवाहात आहे,
मंदिराच्या दगडात आहे,
वृक्षांच्या सावलीत आहे,
लोकांच्या स्मृतीत आहे…
आणि आपल्या संवेदनशील नजरेची वाट पाहत आहे!
श्री वैजनाथ अर्थात श्री नागेश्वर महाराज की जय!
प्रा.जावेद शेख,सिन्नर
लेखक – गोंदेश्वर मंदिर दर्शन
( वरील लेखासाठी चित्रकार परीश जुमानके,कार्तिक झगडे,रोशन गुंजाळ यांनी चित्र व फोटो उपलब्ध करून दिले आहे.)

