
नाशिक: ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल ३४४ कोटी रुपयांचा निधी वळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर ‘बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटन’ने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रविण जगताप यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विट) वरून महायुती सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली असून, हा निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या हक्काच्या निधीची उघड दरोडेखोरी असल्याचे म्हटले आहे.निधी वळवण्याचा निर्णय अन्यायकारकराज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या ३४४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा निषेध करताना प्रविण जगताप म्हणाले, “हा शासन निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. यापूर्वीही आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा हजारो कोटींचा निधी अशाच प्रकारे इतरत्र वळवला गेला आहे.”
सरकारच्या नियोजनाविरोधात संताप”नियोजनाचा अभाव आणि आर्थिक दिवाळखोरीमुळे वंचित घटकांच्या कल्याणकारी योजना ठप्प पाडणाऱ्या या सरकारला जनता कधीच माफ करणार नाही,” असा इशारा जगताप यांनी सरकारला दिला आहे. एका योजनेची चमकोगिरी करण्यासाठी बहुजन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि इतर विकासकामांचा पैसा ओरबाडला जात असल्याचा आरोप बहुजन मुक्ती आंदोलनाकडून करण्यात येत आहे.या निर्णयामुळे राज्यातील मागासवर्गीय आणि शोषित घटकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून आगामी काळात बहुजन मुक्ती आंदोलन याविरोधात रस्त्यावर उतरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

