
विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले प्रत्येक पुस्तक यापुढे शाळाशाळांमध्ये विद्यार्थ्यांसमोरच प्रकाशित केले पाहिजे ! तरच शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार रुजतील, असे उदगार ज्येष्ठ ग्रामीण लेखिका व के के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ यांनी काढले. अर्जुन वेलजाळी व संजय धनगर या लेखकांनी लिहिलेल्या ‘शौर्योदगारांचा इतिहास’ ह्या पुस्तकाचे प्रकाशनप्रसंगी अध्यक्ष पदावरून त्या भा. नगर येथे के के वाघ विद्याभवन व ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर त्या बोलत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या , की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या महान विभूतींनी देशाला संबोधून जे तेजस्वी उदगार काढले, त्या उद्गारांतून तत्कालीन जनमानसात इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण होऊन त्यांना देशासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली, हा तेजस्वी इतिहास विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपला समाज आणि देशाविषयीच्या कर्तव्य पार पाडली पाहिजे.
याप्रसंगी बोलताना माजी शिक्षणाधिकारी मा. वि. ग. बोरस्ते यांनी, विद्यार्थांनी आपले आदर्श जीवन घडवण्यासाठी अभ्यास करणे, देशप्रेम बाळगणे, प्रामाणिक वागणे, खरे बोलणे, आई वडील आणि ज्येष्ठांच्या आज्ञा पाळणे, गुरुवर्यांचा मान राखणे असे उत्तमोत्तम मूल्य, संस्कार आपल्यात रुजवून आपले जीवन घडवावे असे उदगार काढले. प्रा. शिवाजी नाठे, प्रा. यशवंत ढगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे समयोचित भाषण केले. कवी राज शेळके यांनी ‘आयुष्य म्हणजे एक पुस्तक’ या विषयावर आपले विचार मांडले, तर के के वाघ शिक्षण संस्थेचे मा. जनसंपर्क प्रमुख मा. अजिंक्य वाघ यांनीही ‘शौर्योदगारांचा इतिहास’ पुस्तकाच्या लेखकद्वयींना त्यांच्या साहित्यिक प्रवासास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते, अशोक दुधारे, प्राचार्य दिवाकर शेजवळ, अशोक बस्ते, मुख्याध्यापिका उज्ज्वला तासकर व संगीता जगताप, प्राचार्य बाळासाहेब मोंढे, उपमुख्याध्यापिका सुनीता वडघुले, पर्यवेक्षक धनंजय मोरे, शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्याचे संगीतमय स्वागत व भैरवी अमोल मोरे व त्यांच्या चमूने केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अर्जुन वेलजाळी, पुस्तक निर्मितीविषयीची भूमिका संजय धनगर यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन सोनार यांनी, तर आभार प्रदर्शन बाजीराव वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी के के वाघ विद्याभवन व इंग्लिश मिडीयम स्कूल व गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या सर्व स्टाफने प्रयत्न केले.

