
मोहाडी: प्रबोधन व्याख्यानमालेत ‘गावाकडे चल माझ्या दोस्ता…’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रसिद्ध कवी व साहित्यिक इंद्रजीत भालेराव. समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराम मोगल व उपस्थित मान्यवर.
मोहाडी : गावाकडची माती, तेथील माणुसकी, नातीगोती, संस्कृती आणि जगण्यातील साधेपणा हीच आपल्या जीवनाची खरी श्रीमंती आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात विकास स्वीकारताना आपल्या गावची माती, माणसं आणि संस्कृतीशी असलेली नाळ तुटू देऊ नका. गावाकडे परतणे म्हणजे केवळ गावात जाणे नव्हे, तर आपल्या मुळांशी, संस्कारांशी आणि माणुसकीशी पुन्हा जोडले जाणे होय, असा भावस्पर्शी संदेश प्रसिद्ध कवी व साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांनी दिला.
मोहाडी (ता. दिंडोरी) येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान आयोजित व कर्मयोगी कै. एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित श्री अष्टबाहू गोपालकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला २०२६च्या चौथ्या पुष्पात ‘गावाकडे चल माझ्या दोस्ता…’ या विषयावर मार्गदर्शन करताना भालेराव बोलत होते. ग्रामस्थांच्या वतीने हे पुष्प कै. अनिल रामचंद्र मोगरे यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाजाचे उपसभापती देवराम मोगल होते.
इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या ओघवत्या, रसाळ आणि भावस्पर्शी शैलीत ‘गावाकडे चल माझ्या दोस्ता’, ‘बाप’, ‘माझा जन्म’ आदी कविता सादर करत तसेच ग्रामीण जीवनातील ओव्यांचा दाखला देत गावाकडच्या जगण्याचे अनेक पदर उलगडून दाखविले. त्यांच्या कवितांमधून शेतकऱ्यांचे कष्ट, मातीशी असलेले नाते, कुटुंबातील जिव्हाळा आणि ग्रामीण जीवनातील माणुसकीचा ओलावा श्रोत्यांसमोर जिवंत झाला.
गावातील मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे काबाडकष्ट, माणसांमधील जिव्हाळा, सण-उत्सवांची परंपरा, नात्यांमधील आपलेपणा आणि सामूहिक जीवनपद्धती यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. गावाकडच्या साध्या जगण्यात असलेली समृद्धी आणि माणुसकी हीच आपल्या संस्कृतीची खरी ताकद आहे, असे त्यांनी सांगितले.

“गाव सोडून शहराकडे जाताना माणूस अनेक सुविधा मिळवतो; मात्र आपल्या मातीशी असलेले नाते तुटता कामा नये. गावाकडची माणुसकी, संस्कार आणि नात्यांची ऊब हीच आपली खरी ओळख आहे,” असे सांगत त्यांनी नव्या पिढीने आपल्या गावाशी आणि ग्रामीण संस्कृतीशी नाते घट्ट ठेवण्याचे आवाहन केले.ग्रामीण जीवनातील बदलत्या वास्तवावर भाष्य करताना त्यांनी शेतकरी व कष्टकरी समाजाच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. गावाकडील प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर संवेदनशीलतेने आणि जबाबदारीच्या भावनेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मविप्र संचालक नंदकुमार बनकर, प्रवीण जाधव, साहित्यिक विजयकुमार मिठे, विठ्ठलराव संधान, लक्ष्मण महाडिक, तुषार वाघ, युवा उद्योजक प्रशांत यादवराव देशमुख, पुंडलिक मोगरे, मुकुंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मोहाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भालेराव यांच्या कवितांमधून आणि व्याख्यानातून गावाकडच्या मातीचा सुगंध, नात्यांची ऊब आणि माणुसकीचा प्रत्यय आल्याने उपस्थित श्रोते भारावून गेले. ‘गावाकडे चल माझ्या दोस्ता…’ या हाकेतून प्रत्येकाने आपल्या मुळांकडे पुन्हा एकदा वळावे, असा संदेश या व्याख्यानातून मिळाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी केले, तर आभार धनंजय वानले यांनी मानले.

