
‘एक राखी जवानों के नाम अभिनव उपक्रम उत्साहात’
मांडवड:-(प्रतिनिधी)
देशाच्या सीमेवर अहोरात्र जागून भारतमातेचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेचे होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे ‘एक राखी जवानों के नाम’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण आहे. याच भावनेचा विस्तार करत देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या जवानांनाही आपलेपणाची जाणीव व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. या राख्यांसोबत विद्यार्थ्यांनी जवानांसाठी मनापासून शुभेच्छा देणारी पत्रे व संदेशही तयार केले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. “तुम्ही सीमेवर आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत”, “भारत मातेच्या वीर जवानांना मानाचा मुजरा” अशा भावनिक संदेशांतून विद्यार्थ्यांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांमध्ये देशभक्तीची भावना, तिरंग्याचे रंग आणि सैनिकांविषयीचा आदर यांचे सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळाले.असे मनोगतातून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक नानासाहेब काकळीज यांनी सांगितले
सीमेवर प्रतिकूल हवामान, कठीण परिस्थिती आणि अनेक आव्हानांचा सामना करत जवान देशाचे संरक्षण करतात. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देतात. त्यांच्या या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि देशसेवा, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना त्यांच्या मनात रुजावी, या हेतूने शाळेने हा उपक्रम आयोजित केला. शालेय प्राचार्या श्रीमती. पूनम डी मढे यांनी भाषणातून सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छापत्रे जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी माजी सैनिक नानासाहेब काकळीज यांच्यातर्फे पाठविण्यात आल्या. आपल्या लाडक्या भावांना म्हणजेच देशाच्या वीर जवानांना राखी पाठवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दिसून येत होता.
या उपक्रमातून रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीपुरता मर्यादित न ठेवता तो राष्ट्ररक्षणासाठी समर्पित जवानांशी भावनिक नाते जोडणारा ठरला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे म.वि.प्र. संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच पालक, शिक्षक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
होरायझन अकॅडमीच्या वतीने राबविण्यात आलेला ‘एक राखी जवानों के नाम’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा आणि जवानांच्या त्यागाला मनापासून सलाम करणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक सिताराम पिंगळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

