नाशिक:( प्रतिनिधी )- कवयित्री वंदना गांगुर्डे यांनी आपल्या बालकवितांतून नात्यांचा ओलावा, सामाजिक बांधिलकी, निसर्ग संरक्षण आणि संवर्धन या भावना अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत. 'इंद्रधनूचा झुला' हा त्यांचा काव्यसंग्रह मूल्यसंस्कारांची मनोहारी अक्षरबाग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि गीतकार राजेंद्र सोमवंशी यांनी केले. दहाव्या मैलावरील पुस्तकांच्या हॉटेलमध्ये कवयित्री वंदना गांगुर्डे यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित 'इंद्रधनूचा झुला' या बालकाव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षा 'पुस्तकांची आजी' भीमाबाई जोंधळे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, सेवानिवृत्त प्राचार्य राजेश शिंदे, कवी सागर जाधव-जोपूळकर, कवयित्री वंदना गांगुर्डे, प्रा.पी.बी.गांगुर्डे, दत्तात्रय शिंदे, कुसुम शिंदे मंचावर उपस्थित होते. कवी सोमवंशी पुढे म्हणाले की, मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या अनेक संकल्पना आणि संस्कार कवयित्रीने कवितेतून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवितेतून छानसा संदेश देण्याचा प्रयत्नही त्या करताना दिसून येतात. कवयित्री वंदना गांगुर्डे यांचा हा पहिला बालकाव्यसंग्रह मुलांसाठी अत्यंत छानसे काव्यमूल्य जपणारा आहे, असेही ते म्हणाले. सुरेश पवार यांनी वंदना गांगुर्डे यांच्या कवितेचा गौरव करताना ही बालकविता लहानांसह मोठ्यांच्याही मनात विचार पेरेल, असा आशावाद व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात भीमाबाई जोंधळे यांनी उपस्थितांना वाचन संस्कृती जपून संस्कार जोपासण्याची अपेक्षा व्यक्त केली. कवयित्री वंदना गांगुर्डे यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक साहित्यिकाने किमान एकतरी बालसाहित्य लिहायलाच हवे, असे सांगितले. कवी सागर जाधव-जोपूळकर, प्रा.पी.बी.गांगुर्डे यांचीही समायोचित भाषणे झाली. कारभारी गांगुर्डे, प्रवीण जोंधळे, रवींद्र मालुंजकर, किरण क्षीरसागर, सविता दरेकर, मुकुंद ताकाटे आदींसह रसिक उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपूजन करण्यात आले. प्राचार्य राजेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली शिंदे यांनी आभार मानले. प्रा.गंगा गवळी-पवार यांनी सूत्रसंचालन केले.