
पळसे-राज्यकर्ता प्रतिष्ठानची रंगतदार ‘दीपावली काव्यपहाट!’
पळसे:-( प्रतिनिधी)
सणास जमती सर्व नातलग,मनामनांची असे दिवाळी
सुखास ज्यांना टिपता येते,त्या सर्वांची असे दिवाळी
युवाकवी प्रशांत केंदळे यांच्या रचनेसह चतुरस्त्र कवी प्रा.राजेश्वर शेळके, निवेदक रवींद्र मालुंजकर आणि नवोदित कवींनी पळसे येथील राज्यकर्ता युवा प्रतिष्ठानने पळसे-नानेगाव चौफुलीवरील नवले लॉन्सच्या हिरवळीवर सलग चौथ्या वर्षी दीपावलीनिमित्त आयोजित ‘कविता मनामनातल्या…’ ही ‘दीपावली काव्यपहाट’ उत्तरोत्तर रंगत गेली.
दिवाळीच्या चैतन्यासह पहाटेच्या गुलाबी थंडीत गावखेड्यातील शेतीमातीत राबणाऱ्या रसिकांच्या उपस्थितीने रंगलेल्या मैफिलीत कवी प्रा.राजेश्वर शेळके यांनी आपल्या एका गझलेतील-
किती फायदा झाला यंदा मोजत बसली एक दिवाळी
एक दिवाळी आस्मानीच्या सुलतानीशी लढते आहे…
यासारख्या आशयसंपन्न शेरांनी दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाची व्यथा मांडत रसिकांना अंतर्मुख केले.
त्याचबरोबर कवयित्री लीलाताई गायधनी, युवाकवी शरद आडके, समाधान गायधनी, प्रशांत कापसे, ज्ञानेश पिसे, डॉ.संजय पवार, गेणूजी गायधनी, रामचंद्र शिंदे, तुषार गडाख, विवेक गायधनी यांनीही कविता सादर केल्या.
लक्ष दीपांची आरास,प्रत्येकाच्या घरीदारी…
सोनियाच्या पावलांनी,आली लक्षुमीची स्वारी
या रचनेसह कवी रवींद्र मालुंजकर यांनी निवेदनात सादर केलेल्या कवितांनी मैफिल उंचीवर गेली.
पळसे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हस्के, कामगार नेते नामदेव गायधनी, अशोक गायधनी, उपप्राचार्य एस.एस.गायधनी, प्राचार्य रामदास गायधनी, नवले लॉन्सचे संचालक योगेश नवले, पळसे गावच्या सरपंच शोभाताई गायधनी, कृपासिंधू ग्रुपचे संचालक भारत ढेरिंगे, धनसमृद्धी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शामराव गायधनी, नासाका विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार, पळसे गावचे माजी सरपंच दीपक गायधनी, माजी उपसरपंच सुनील गायधनी, दिलीप गायधनी, भास्कर गायधनी, नानेगावचे माजी सरपंच संजय आडके, सुखदेव आडके, विलास गायधनी, नानासाहेब सरोदे, रंजन चौधरी, ग्रामाभिमान मंचचे राहुल फडोळ, सोहम गायधनी, डॉ.संजयकुमार गायधनी, अंजली पगार, प्रताप गायधनी, राजेश रुद्रे, मोतीराम तिदमे, कृष्णा सोनवणे, गणपत गायधनी, सतीश गायधनी, लक्ष्मण जाधव, गोकुळ गायधनी, भाऊराव जाधव यांसह पळसे पंचक्रोशीतील महिलांसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित रसिकांमधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमधील २५ भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. राज्यकर्ता युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय गायधनी, दिलीप गायधनी, तुषार गायधनी, विजय गायधनी, शरद तिदमे, अविनाश गायधनी, तुषार गडाख, सुनील गायधनी, श्रीकांत गायधनी, सुभाष गायधनी, महेश जाधव, आदित्य गायधनी, अजित गायधनी आदींनी संयोजन केले. प्रमुख संयोजक संतोष गायधनी यांनी आभार मानले.

