
नाशिक शहरात आणि जिल्ह्यात फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीने होत असलेल्या पर्यावरणातील हवा व ध्वनिप्रदूषणामुळे माणसांसह सर्वच सजीवांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.
हा गंभीर धोका टाळण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी शासन- प्रशासनाला याबात वेळोवेळी दिलेल्या आदेशांची तातडीने व सक्तीची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अगदी छोट्या-मोठ्या खेड्यांमध्ये सुद्धा दीपावलीच्या सणानिमित्ताने काल रात्री लोकांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. त्यामुळे शहरात तर अनेक लोकांना श्वास घेणेही अवघड झाले होते . अगदी सकाळपर्यंत हवेमध्ये धुराचे व धुलीकणाचे स्तर तरंगताना दिसत होते.
फटाक्यांच्या प्रचंड आवाजाने कानठळ्या बसून, कानाचे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता अनेकांमध्ये निर्माण झाली आहे.
फटांक्यांच्या जमिनीवरील तसेच आकाशातील प्रचंड आतषबाजीचा तीव्र प्रकाश व प्रचंड आवाज यामुळे प्राणी- पक्षी जीव वाचवण्यासाठी भीतीने घाबरून,रात्रीच्या अंधारात सैरभैर होऊन, वाट मिळेल तिकडे पळत होते. उडत होते. त्यामुळे त्यांना अपघात होत होते.
फटाक्यांच्या बेसुमार आतषबाजीमुळे नाशिक शहरातच जवळपास पंचवीस ठिकाणी आगी लागल्याच्या तसेच अपघात झाल्याच्या घटना घडल्याचे समजते.
अतिशय गंभीर बाब म्हणजे फटाक्यांची आतषबाजी करण्यामध्ये तरुणांबरोबरच कुमार वयातील मुलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून आले. त्यामुळे कायद्याचे आदेश या तरुणांपर्यंत आणि कुमार वयातील मुलांपर्यंत पोहोचलेच नाहीत, किंवा कायद्याची “ऐसी की तैसी,” ही भावना तरुणांमध्ये रुजली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सण ,समारंभ, उत्सवांचा आनंदा जरूर घ्या. मात्र सर्व धर्मीयांचे सर्व सण, उत्सव, समारंभ हे पर्यावरण स्नेही साजरे व्हावेत ,त्यांनी तसे ते साजरे करावेत, अशा प्रकारचे कृतिशील लोकप्रबोधन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील तीस वर्षांपासून शाळा, महाविद्यालये तसेच गाव शहरांमधील लोकांपर्यंत करीत आहे.
त्याचा इष्ट परिणामही झाला आहे .
खरं तर फटाके उडवल्याने कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही.उलट पैशांची आणि पर्यावरणाची बेसुमार हानीच होते. पैशाचा धूर निघतो आणि बालमजुरी वाढते.
शिवाय फटाक्यांची आतषबाजी हा कोणत्याही धर्माच्या धर्मपालनाचा भाग नाही, असे महाराष्ट्र अंनिसचे ठाम मत आहे.
अविवेकाची काजळी खरडवून, विवेकाचा दिवा अधिक प्रज्वलित करणे असे दिवाळीच्या सणाबाबत संत वचन आहे. या संतवाचनाप्रमाणे केवळ दिवाळीच नव्हे तर इतर सर्व सण,समारंभ, उत्सव साजरे करावेत, महाराष्ट्रात पडलेल्या भयंकर दुष्काळाचे भान ठेवून पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी लोकांनी तातडीने थांबवावी असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
फटाके उडवताना ,
फटाक्यांची आतषबाजी करताना पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, हवा आणि ध्वनी यांचे अजिबात प्रदूषण होणार नाही, मानवासहित सर्व सजीवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित सर्वांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी, असे सक्त आदेश मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय यांनी शासन प्रशासनाला वेळोवेळी दिलेले आहेत.मात्र त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसली नाही.
न्यायालयाने नमूद केलेल्या वेळेपेक्षा, दुप्पट वेळेहून अधिक वेळ म्हणजे अगदी मध्यरात्रीपर्यंत नाशिक शहरासह विविध शहरात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी सुरु होती.
त्यामुळे लहान मुले, वृद्ध माणसे, रूग्ण, प्राणी- पक्षी यांना प्रचंड त्रास होत होता.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध ठिकाणी करण्यात आलेली फटाक्यांची प्रचंड आतषबाजी ही न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवणारी, पर्यावरणाचे अतोनात नुकसान करणारी, प्राणी- पक्षी आणि मनुष्य जातीच्या जीवावर उठणारी अशीच होती, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाम मत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
म्हणून किमान पुढील चार-पाच दिवसातील फटाक्यांची प्रचंड आतषबाजी रोखण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी मा. न्यायालयांच्या आदेशांची तातडीने व सक्तीचे अंमलबजावणी करण्याकरिता त्यांच्या अधिकारातील सर्व यंत्रांनाना आदेशित करावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे
निवेदनावर महाराष्ट्र अंधश्रद्धा नुसार समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी. आर. गोराणे, जातपंचायतीला मूठ माती अभियान विभागाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

