
नांदगाव:-( प्रतिनिधी)
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव विद्यालयातील इयत्ता ८ वीचा विद्यार्थी कृष्णा कुमावत याने तालुकास्तरीय विज्ञान वकृत्व स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी ‘व्हि. जे. हायस्कूल’ येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात “भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७: भवितव्य (संधी) आणि आव्हाने” या मुख्य विषयावर वकृत्व स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कृष्णा कुमावत याने भारतीय ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य, त्यातील रोजगाराच्या व विकासाच्या संधी आणि देशासमोरील प्रमुख आव्हाने यांवर अत्यंत प्रभावीपणे विचार मांडले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. प्रकाश आहेर व श्री. राजेंद्र वाघ यांनी काम पाहिले. याप्रसंगी विस्तार अधिकारी श्री. शैलेश टिळेकर आणि केंद्र प्रमुख श्री. प्रवीण ठाकरे विशेष म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले.
या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय काकळीज, मुख्याध्यापिका ज्योती काळे, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

