
नाशिक / मालेगाव (प्रतिनिधी) – गरिबी, मोलमजुरी आणि दुष्काळातून शिक्षणासाठी गावोगाव भटकणारा मुलगा आज महाराष्ट्राचा गुणवंत कामगार आणि ९ पुस्तकांचा साहित्यिक झाला आहे. ही प्रेरणादायी कहाणी आहे कवी, लेखक सुरेश रौंदळ यांची मुलाखत घेतली महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे सचिव श्री . एस बी देशमुख सिन्नर व बागलानचे संस्थाचालक श्री गोकुळ जाधव मुंजवाड यांनी
_
मूळ गाव – मालेगाव तालुक्यातील डुंधे. घरची गरिबी, आई-वडील मोलमजुरी करणारे. २५ जून १९७७ रोजी शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं. पोटापाण्यामुळे शिक्षण १२ वी पर्यंत, नंतर नाशिक जिल्ह्यात करंजवण धरणाच्या काठावर ITI, आणि नंतर संभाजीनगर येथे बजाज ऑटोमध्ये कामगार म्हणून नोकरी. ‘कष्टाविण फळ नाही’ हे तिथेच शिकलो, असे ते सांगतात.
१४ गावांचा अनुभव हेच भांडवल – काम करताना हाताला पडलेले घट्टे, अंगावरचा घाम आणि रक्तबंबाळ हातानेच त्यांनी कथा, कविता, कादंबरी लिहिल्या. जे जगलो तेच लिहिले. हे लिखाण म्हणजे काल्पनिक नाही तर जगण्याची नोंद आहे.
त्यांचे आतापर्यंत ३ कविता संग्रह, ३ कथा संग्रह, २ कादंबरी, १ अहिराणी काव्य आणि १ ललित गद्य असे ९ पुस्तक प्रकाशित झाले आहेत. अजून ४ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
पुरस्कारांचा गौरव –
- ‘उगार’ कथासंग्रहाला पुणे येथे केशव मेश्राम यांच्या हस्ते हरी नारायण आपटे कामगार साहित्य पुरस्कार
- ‘काळा बैल’ ला उत्तम कांबळे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा हाच पुरस्कार
- दि. २९ जानेवारी २००६ रोजी महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार
- संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा अनंत फंदी पुरस्कार
- भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार
- शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
८ तास कंपनीत काम केल्यानंतर उरलेल्या वेळातच मी हे सर्व साहित्य आणि सामाजिक कार्य केले आहे, असे रौंदळ सांगतात. त्यांना गुरुवर्य प्रा. डॉ. नरेंद्र मारबाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कामगार, शेतकरी, बालकामगार आणि श्रमिक स्त्रियांच्या वेदना मांडणारा हा लेखक आज नव्या लेखकांसाठी प्रेरणा ठरत आहे.

