
नाशिकरोड:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ आणि स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात एक दिवशीय शिबीर विविध व्याख्यांनांनी संपन्न झाले.

प्रा.डाॅ.गिरीश पाटील यांनी प्रथम पुष्प ‘सवयीविषयी बोलू काही’ या विषयावर गुंफताना प्रत्येक माणसाचा स्वभाव कधी वाईट सवयी तर कधी चांगल्या सवयींचा बनलेला असतो. जीवनात आलेल्या अनेक अडीअडचणी आणि संकटे यातून व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होत जाते. चहाची सवय, मोबाईलचा अनावश्यक वापर इत्यादी गोष्टी दूर ठेवण्यासाठी गरज असते. गायन, शास्त्रीय संगीत ऐकणे, लवकर उठणे, व्यायाम करणे, योगाभ्यास आणि हास्यप्रकार नियमितपणे केल्यास जीवन आनंदमय होण्यास निरामय होण्यास निश्चितच मदत होते, असे विचार मांडले.

डाॅ.उत्तम करमाळकर यांनी ‘कथाकथन : एक तंत्र आणि मंत्र’ या विषयावर गुंफताना आदर्श सुसंवाद साधत मार्गदर्शन केले. पाठीमागे वळून बघताना अथवा इतिहासाची पाने चाळताना अनेक कथा आपल्याला समजून येतात. कथाकथनात कथेची निवड, आवाजाचा प्रभावीपणे केलेला उपयोग, आवाजातील चढ-उतार, शारीरिक हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव, स्पष्ट आणि शुद्ध भाषा, उपस्थित प्रेक्षकांशी नजरेने आणि संवादाने साधलेला सुसंवाद यातून उपस्थितांची गरज आणि आवड समजून येते, असे प्रतिपादन केले. त्यांच्या आवाहनानुसार अरुण देशपांडे, बाळासाहेब घोरपडे, रवींद्र चंद्रात्रे, सुधा डमरे, दीपाली भिंगारकर यांनी उस्फूर्त कथाकथन केले. संस्थेच्या उपाध्यक्षा सुनंदा गोसावी यांनी ‘आयुष्याचा कोरा कॅनव्हास’ ही कथा सात मिनिटात सांगत उपस्थितांची वाहवा मिळवली. डॉ.करमाळकर यांनी व्याख्यानाच्या शेवटी विनोदी साहित्यिक पु.ल.देशपांडे यांची ‘हरीतात्या’ ही कथा प्रभावीपणे सादर केली.

भोजनोत्तर तिसरे पुष्प ‘कसं जगायचं; रडत रडत की गाणं म्हणत?’ या विषयावर गुंफताना प्रो.प्रीतम नाकील यांनी संगीताच्या माध्यमातून आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी हिंदुस्तानी शास्त्रीय रागदारी संगीतावर आपले विचार व्यक्त करताना आपल्या शास्त्रीय संगीताने ताण-तणाव, स्मृतिभ्रंश, उच्च रक्तदाब, तसेच मानसिक आणि शारीरिक व्याधी कशा दूर ठेवता येतात; याविषयी उदाहरणासह त्यांनी सविस्तर माहिती ही रागदारी आणि सुगम संगीताच्या गायनातून दिली.
समारोपाचे पुष्प वृषाली घोलप यांनी ‘शंखवादनातून जपूया आरोग्य’ या विषयावर विचार मांडत उपस्थितांशी हितगुज केले. शंखाची समुद्राच्या तळातून उत्पत्ती ते शंखवादनातून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळते, हा प्रवास सप्रयोग सांगितला.
शिबीर यशस्वीतेसाठी सचिव आणि केंद्रकार्यवाह अविनाश गोसावी, उपसचिव श्रीकांत मोहरील, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, सुधाकर सोनवणे, वसंतराव उपासनी, भाऊसाहेब घोरपडे, वैजयंती चंद्रात्रे, दीपाली भिंगारकर, मंजुषा पुराणिक, मंदाकिनी मुदलियार, ज्योती जोशी, मनीषा जोशी, नाईक कल्पना वैद्य, सुधा डमरे, वैजयंती डांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. रवींद्र चंद्रात्रे, मंजुषा पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.

