लेखक:
कृष्णा गुरुजी जोशी.

विंचूर येथील भवानी पेठ परिसरात आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय नवरात्र महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान मुलांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच जादूगाराच्या आकर्षक प्रयोगांनी कार्यक्रमात रंगत आणली.
या महोत्सवात सुपरस्टार भैया मोरे, हितेश शिवदे, जगदीश चव्हाण आणि अमोल पालेकर यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सेलिब्रिटी सौ. स्वाती बालटे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच दीपक आहेर आणि तुषार देवरे यांनी आपल्या प्रभावी वाणीने सूत्रसंचालन करत उपस्थितांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले.
महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये पैठणी, चांदीची नाणी आणि विविध आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. लहान मुलांना आपली कला सादर करण्यासाठी सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे मुलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान भवानी पेठ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतोष भाऊ कांगणे उपस्थित होते. तसेच संदीप गुरुजी आणि सरपंच सचिन दादा दरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वागत कक्षाची जबाबदारी कैलास शेठ सोनवणे आणि किशोर जेउघाले यांनी सांभाळली. नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून मनोरंजन, कला, संस्कृती आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. आयोजक मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा पाच दिवसीय महोत्सव विंचूरकरांच्या कायम स्मरणात राहील, अशा वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

