
बालसंस्कार व समाज संघटनात संघाचे मोठे योगदान: डॉ. आनंद पाटील
नाशिकरोड (विशेष प्रतिनिधी):
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नाशिकरोड गट अंतर्गत मुक्तीधाम नगराचा वार्षिक शस्त्रपूजन उत्सव नुकताच नवीन मराठी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद पाटील, मुख्य वक्ते म्हणून नाशिक शहर सह-सेवा प्रमुख श्योगेश गर्गे तसेच रा. स्व. संघाचे नाशिकरोड गट सह-कार्यवाह मनोज वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘घोष प्रत्यक्षिकांनी’ झाली. यानंतर बाल स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार, पदविन्यास, दंड व व्यायामयोगाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
बालपणीच्या आठवणी व शाखेचे महत्त्व:
आपल्या मार्गदर्शनात डॉ. आनंद पाटील यांनी बालपणीच्या संघाच्या शाखेतील आठवणींना उजाळा दिला. लहान मुलांवर उत्तम संस्कार घडवण्यात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात संघाच्या शाखेचे अत्यंत महत्त्वाचे योगदान असल्याचे त्यांनी या वेळी प्रतिपादन केले.
हिंदू संस्कृतीत शस्त्रपूजनाचे स्थान:
मुख्य वक्ते योगेश गर्गे यांनी आपल्या बौद्धिकमध्ये विजयादशमी व शस्त्रपूजनाचे हिंदू संस्कृतीतील आणि इतिहासामधील महत्त्व विषद केले. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांमुळे समाजात घडत असलेल्या सकारात्मक परिवर्तनावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच आजच्या काळात आत्मकेंद्रित होत चाललेल्या हिंदू समाजाला संघटित करणे का गरजेचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
या कार्यक्रमास पूर्ण गणवेशातील १०८ स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक मिळून सुमारे १६० पेक्षा जास्त उपस्थिती होती.

