
नागपूर मोर्चाच्या जनजागृतीसह पतसंस्था निवडणुका, कार्यकारिणी पुनर्गठन व प्रलंबित प्रश्नांवर मंथन
भंडारदरा, दि. १७ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, नाशिकच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त भंडारदरा येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष वैभव गगे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत संघटनेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबरच आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, कर्मचारीहिताचे प्रश्न आणि विविध आंदोलनांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत जिल्हा सरचिटणीस प्रमोद क्षीरसागर यांनी संघटनेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जिल्हा समन्वयक अमोल पाटील यांनी जुनी पेन्शनच्या लढ्यात संघटित शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. तर जिल्हाध्यक्ष वैभव गगे यांनी संघटनेची ताकद वाढविणे, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे शासनदरबारी मांडण्यासाठी नियोजनबद्ध कार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीत पाच प्रमुख विषयांवर विशेष भर देण्यात आला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित मोर्चासाठी जिल्हाभर जनजागृती करणे, जिल्हा व तालुकास्तरीय सहकारी पतसंस्थांच्या निवडणुका लढविणे, जिल्हा व तालुका कार्यकारिण्यांचे पुनर्गठन करणे, आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी पाठपुरावा करणे आणि प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावाबाबत आंदोलनाची दिशा निश्चित करणे, या विषयांवर चर्चा झाली.
संघटनेच्या आगामी वाटचालीत कर्मचारीहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष वैभव गगे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद क्षीरसागर, जिल्हा समन्वयक अमोल पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी भोये , जिल्हा प्रसिद्धिप्रमुख पृथ्वी राठोड, जिल्हा नेते विलास महाले, तालुकाध्यक्ष दिलीप बेंडकोळी, दुर्वादास गायकवाड, पंकज सोनवणे, देविदास हिंदोळे, रवी सातव, किसन दडस यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व पेन्शन फायटर्स उपस्थित होते.
संघटनात्मक एकजूट, कर्मचारीहिताचे संरक्षण आणि जुनी पेन्शन प्राप्तीचा लढा अधिक प्रभावी करण्याच्या निर्धाराने ही बैठक संपन्न झाली.

