
▫️शारदीय नवरात्र उत्सव उद्या विजयादशमी स्वरूपात मोठ्या भक्तिभावाने साजरा होईल. या निमित्ताने गोंदेश्वर मंदिरातील आदिशक्ती,आदिमाया शिल्पे,शक्तीस्वरूप आदिमायाची पौराणिक कथा व गोंदेश्वर मंदिरातील शिल्पाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत.
आदिशक्ती दुर्गा – महिषासुर मर्दिनी
गोंदेश्वर मंदिर हे शैव पंचायतन मंदिर असल्यामुळे स्वतंत्र शक्तीचे उपआयतन मंदिर संकुलात आहे.परंतु असे असले तरी संपूर्ण मंदिर संकुलात अनेक देवींचे शक्तीस्वरूप शिल्पे मंदिरावरती अंकित केलेले आहे.
विजयादशमीच्या निमित्ताने आदिशक्ती – आदिमाया अंबिका,दुर्गा देवीचे महिषासुर मर्दिनी रूपाचे गोंदेश्वर मंदिरातील विविध शिल्पे,त्यामागील पौराणिक कथा व त्यामागील दैवी संदेश जाणून घेऊ या..
देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तशतीमध्ये महिषासुर वधाची कथा आढळते. ही कथा थोडक्यात खालीलप्रमाणे आहे:
महिषासुराचे वरदान आणि अत्याचार:
रंभासूर नावाच्या राक्षसाचा मुलगा ‘महिषासुर’ (महिष म्हणजे रेडा) याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली. त्याने ब्रह्मदेवाकडून असा वर मागितला की, “माझा मृत्यू कोणत्याही देव, मानव,यक्ष,गंधर्व किंवा प्राण्याकडून होणार नाही असे वर मागितले.ब्रह्मदेवाने वर देण्याच्या अगोदर विचारले की,”वरदान मागताना तू नारी वगळली आहेस”.अहंकाराने अंध झालेला महिषासुराने गर्वाने सांगितले की,”नारी अबला असते वरदान मागताना जर मी नारी यात समावेश केला तर हा माझा व माझ्या पराक्रमाचा अपमान ठरेल”.स्त्रीला अबला समजून त्याने वरील वर मागितला होता. वर मिळताच महिषासुर अत्यंत शक्तिशाली झाला. त्याने तिन्ही लोकांवर अत्याचार सुरू केले आणि इंद्राचा पराभव करून स्वर्गावर ताबा मिळवला.
आदिशक्तीची निर्मिती
महिषासुराच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेले सर्व देव ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकरांकडे गेले. देवांचे संकट ऐकून सर्व देवतांच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर पडले. या एकत्रित तेजातून एका अत्यंत शक्तिशाली आणि रूपवान देवीची निर्मिती झाली, तीच आदिशक्ती माता दुर्गा. सर्व देवांनी तिला आपली अस्त्रे दिली—शंकरांनी त्रिशूळ, विष्णूंनी चक्र, इंद्राने वज्र आणि पर्वतराज हिमालयाने सिंह हे वाहन दिले.
महाभयंकर युद्ध
सर्व अस्त्रांनी सज्ज होऊन देवी दुर्गेने महिषासुराला युद्धाचे आव्हान दिले. महिषासुर आणि देवीच्या सैन्यामध्ये नऊ दिवस महाभयंकर युद्ध चालले. महिषासुराने सिंह, हत्ती आणि रेडा अशी अनेक रूपे घेऊन देवीला चकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, देवीने त्याच्या अफाट सैन्याचा आणि बलाढ्य राक्षसांचा नाश केला.
महिषासुराचा वध
युद्धाच्या दहाव्या दिवशी जेव्हा महिषासुर पुन्हा रेड्याच्या रूपात आला, तेव्हा देवीने आपला पाय त्याच्यावर ठेवला आणि आपल्या त्रिशूळाने त्याच्या छातीवर प्रहार केला. महिषासुराचा मुखातून मूळ राक्षस बाहेर पडू लागला, त्याच क्षणी देवीने तलवार चालवून त्याचे शीर धडावेगळे केले. अशा प्रकारे महिषासुराचा अंत झाला.
महत्त्व
महिषासुराचा वध केल्यामुळे देवीला ‘महिषासुरमर्दिनी’ (महिषासुराचे मर्दन करणारी) हे नाव मिळाले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हे नऊ दिवस नऊरात्री (नवरात्र) साजरी केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी (दसरा) साजरी केली जाते.
🔸गोंदेश्वर मंदिरातील आदिशक्तीचे महिषासुर मर्दिनी शिल्पे🔸
गोंदेश्वर मंदिराच्या सभा मंडपाच्या खांबावरती सुंदर असे महिषासुर मर्दिनीचे दोन शिल्पांकन केलेले दिसून येते.
▫️उत्तर पूर्व खांबावरती असणाऱ्या कोष्टकातील शिल्पात आदिशक्ती हातात त्रिशूळ घेऊन पायाखाली रेड्यारूपात असणाऱ्या महिषासुराचा वध करताना दिसत आहे.देवी उग्र रूपात व असून एका हाताने खड्ग उगारलेले आहे.देवीच्या दोन्ही बाजूला महिषासुराचा वध झाल्यामुळे त्रिलोकात आनंद झाला आहे याचे प्रतीक म्हणून नृत्य करताना दैवी आकृत्या दिसत आहेत.
▫️दक्षिण पूर्व खांबाच्या अधोभागातील कोष्टकात सुंदर असे महिषासुर मर्दिनीचे शिल्प असून देवी दोन हातानी त्रिशूळने रेड्यारूप महिषाचा वध करताना दिसत असून देवीचा एक पाय त्याच्या पाठीवर आहे.देवीच्या एका हातात ढाल असून इतर भाग झिझलेला आहे.देवीचे मुख, हात,महिषाचे मुख जरी झिजलेले असले तरी देवीच्या अंगातील दागिने,मुकुट,पायातील-हातातील आभूषणे,देवीचे युद्धस्वरूप उग्र रूपाचे सुंदर अंकन शिल्पातून नजरेस पडतात.
विजयादशमीच्या निमित्ताने आवर्जून गोंदेश्वर मंदिराला भेट द्या व आदिशक्तीचे मनोभावे दर्शन अवश्य घ्या…
-प्रा.जावेद शेख,सिन्नर
- पुस्तक गोंदेश्वर मंदिर दर्शन
- 8329839434

