
कर्तृत्वाचा सन्मान, समर्पणाचा गौरव आणि शैक्षणिक सेवेचा अभिमान म्हणजेच ‘नवदुर्गा पुरस्कार
सिन्नर : प्रतिनिधी
शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सिन्नर यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले बालमंदिरच्या शिक्षिका श्रीमती निलिमा अरुण बलक यांना प्रतिष्ठेचा ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करणाऱ्या या सन्मानामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्काराचे वितरण धर्मादाय उपायुक्त मा. सौ. प्रणिता श्रीनिवार मॅडम, वैद्यकीय अधीक्षक सौ. डॉ. निर्मला नारायण गायकवाड मॅडम आणि सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. नामदेवराव लोणारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

बालवयातील शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा भक्कम पाया असतो. या जाणीवेतून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या श्रीमती निलिमा बलक यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या मेहनतीला, कर्तृत्वाला आणि शैक्षणिक सेवेला मिळालेली कौतुकाची पावती आहे. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
या कार्यक्रमाला शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर, सिन्नरच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता राजगुरू मॅडम तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या गौरवाबद्दल सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव लोंढे साहेब, सेक्रेटरी मा. श्री. नामदेवराव लोणारे साहेब, संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य आदरणीय देशमुख सर आणि मुख्याध्यापिका सौ. संगिता राजगुरू मॅडम यांनी श्रीमती निलिमा अरुण बलक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

