
कवी राजेंद्र सोमवंशी व कवी प्रशांत केंदळे यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद…..
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळा वेळुंजे येथे कवी आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध बालसाहित्यिक इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील कवी राजेंद्र सोमवंशी व सुप्रसिद्ध कवी प्रशांत केंदळे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शाळेचे समन्वयक बी.डी. आहेर सर, मुख्याध्यापक श्री.गोपाळ उघडे सर व एस. एन.एस.फाउंडेशनचे बडगुजर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थीनींनी सुंदर स्वागत गीत सादर केले .

कवी राजेंद्र सोमवंशी व कवी प्रशांत केंदळे यांनी काव्य गायनात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत वेगळाच उत्साह निर्माण केला.

विविध विषयांवर सादर केलेल्या कवितांना उदंड प्रतिसाद मिळाला. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी ” चल शिकाया चल ग सरू “, ” कोल्होबाची फजिती ” ,” साऱ्यांनी मिळून ठरवायचं, शाळेला छान छान बनवायचं ” या कवितांसह कविता निर्मितीतील गंमत जंमत विद्यार्थ्यांपुढे मांडली. कवी प्रशांत केंदळे यांनी ” शाळा माझी सुंदर आहे” , ” मानव व्हायचे “, ” निसर्गाची शाळा जिथे माती झाली फळा , पावसाच्या अक्षराने लिहिलेला मळा ” या कवितांसह विविध किस्से विनोद सांगून विद्यार्थ्यांना आनंद दिला.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके व संस्थेचे सचिव राजेंद्र निकम यांनी शुभेच्छा दिल्या तर समन्वयक बी.डी.आहेर सर यांनी मार्गदर्शन व मुख्याध्यापक गोपाळ उघडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन शामकांत बोरसे यांनी केले. मान्यवर कवींचा परिचय मच्छिंद्र बोडके व निलेश अहिरे यांनी करून दिला.
सूत्रसंचालन शामकांत बोरसे
यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मेघा वाघ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

