
पिंपरी हवेली (प्रतिनिधी), दि. १९ ऑक्टोबर : भारतीय संस्कृतीत कन्येला देवीचे रूप मानले जाते.याच संस्कारमूल्यांची जपणूक करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरमाथा (पिंपरी हवेली) येथे आज शाळेतील सर्व विद्यार्थिनी तसेच अंगणवाडीतील विद्यार्थिनींचे कन्या पूजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.शाळेच्या अध्यक्षा श्रीमती सरिता दुलचंद राठोड यांच्या हस्ते कन्यांचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून देण्यात आले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांप्रती प्रेम,आदर,समानता आणि शिक्षणाविषयीची आस्था व्यक्त करण्यात आली.कन्या पूजनाच्या वेळी चिमुकल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद आणि निरागस हास्याने संपूर्ण शालेय परिसर प्रसन्न झाला होता.जणू काही शाळेच्या या ज्ञानमंदिरात साक्षात देवींचीच रूपे विराजमान झाली आहेत,असे भावपूर्ण चित्र या प्रसंगी पाहायला मिळाले.’कन्या’ही केवळ पूजनाची प्रतिमा नसून ती उद्याच्या सक्षम समाजाची निर्माती आहे,’हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती,स्त्री-सन्मान आणि चांगल्या संस्कारांची रुजवणूक व्हावी,तसेच शिक्षणाची गोडी वाढावी,या दृष्टिकोनातून हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील चिमुकल्यांचाही या उपक्रमात सहभाग असल्याने शाळा आणि अंगणवाडी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक कल्याण पाटील सर व उपशिक्षक रामचंद्र पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अशा उपक्रमांमुळे शालेय शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता संस्कार, संवेदनशीलता आणि सामाजिक मूल्यांची शिकवण देणारे ठरते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

