
नाशिकरोड:- ( प्रतिनिधी ) गेल्या ३५ वर्षांपासून भगूर आणि पंचक्रोशीत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने होतकरू विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करत दातृत्वाचा वसा जपला.
नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात स्वा.सावरकर जयंती उत्सव समिती आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या माध्यमातून नासाका माध्यमिक विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात समितीचे संस्थापक सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, भगूर नगरपरिषदेचे नगरसेवक दीपक बलकवडे, सेवानिवृत्त जिल्हा वनाधिकारी राजेंद्र कापसे, समितीचे नियोजन समिती अध्यक्ष अनिल पवार, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव खैरनार, समितीचे सरचिटणीस प्रशांत कापसे, नासाका बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विलास गायधनी मंचावर उपस्थित होते
दीपक बलकवडे, अनिल पवार, वसंतराव खैरनार यांनी आपल्या भाषणात सावरकर उत्सव समितीचे सेवाभावी कार्य सांगत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा सुयोग्य वापर करत ज्ञानसंपन्न होण्याचा संदेश दिला. या सेवाभावी उपक्रमाबद्दल समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. संग्राम करंजकर यांनी आभार मानले.

