
नाशिक (प्रतिनिधी):
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुक्तीधाम नगराचे विजयादशमीला निघणारे पथसंचलन मंगळवारी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
संचालनाचा मार्ग
या संचलनाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता मुक्तीधाम मागील १२५ मैदानावरून झाली. पुढे सोमाणी गार्डन, मुक्तीधाम मंदिर, बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, टीजेएसबी (TJSB) बँक असे मार्गक्रमण करत या संचलनाचा समारोप पुन्हा १२५ मैदानावर झाला.
विशेष उपस्थिती आणि स्वागत
संघाच्या या पथसंचलनात प्रमुख अतिथी म्हणून माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड हे आपल्या सुविद्य पत्नी तथा सायकलिस्ट सौ. नलिनी कड यांच्यासह उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संपर्क प्रमुख श्री विवेक सराफ व नाशिकरोड गट सहकार्यवाह श्री. मनोज वानखेडे हे उपस्थित होते.

संचालनादरम्यान सुरुवातीला प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर घोषातील विविध वाद्यांच्या तालबद्ध सुरावटीवर स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलन केले. परिसरातील नागरिकांनी मार्गामध्ये विविध ठिकाणी रांगोळ्या काढून आणि भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करत संचलनाचे जोरदार स्वागत केले.
या संचलनात पाच वर्षाच्या बालकपासून ते सत्तर वर्षांच्या जेष्ठापर्यंत सर्व वयोगटातील एकूण १३७ गणवेशधारी स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच, संचलनाचे स्वागत करण्यासाठी परिसरातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

