
श्रीलंकेतील कोलंबो येथे २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय मालिका
नाशिक : फिफ्टी बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय फिफ्टी बॉल्स क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या तीन खेळाडूंची श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिफ्टी बॉल्स क्रिकेट बायलॅटरल सिरीजसाठी निवड झाली आहे. ही आंतरराष्ट्रीय मालिका २१ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
या मालिकेसाठी नाशिकचे तनवीर सय्यद, तेज जैन आणि श्रवण मुंदडा हे तीन खेळाडू आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले. तनवीर सय्यद हा के. के. वाघ युनिव्हर्सल स्कूल, सरस्वतीनगर येथील खेळाडू असून तेज जैन आणि श्रवण मुंदडा हे दोघे ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथील खेळाडू आहेत.
या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संपूर्ण भारतातून १५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील अशा दोन वयोगटांतील खेळाडूंचे संघ सहभागी होणार आहेत. हे संघ उद्या सकाळी मुंबई येथून विमानाने श्रीलंकेसाठी रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातील एकूण सहा खेळाडूंना या मालिकेसाठी संधी मिळाली असून, नाशिकच्या तीन खेळाडूंसह अहिल्यानगर येथील प्रणव काकडे आणि सोहम करपे तसेच अमरावती येथील आरिष कुरेशी यांचीही निवड झाली आहे.
महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र फिफ्टी बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. योगेश चौधरी हे खेळाडूंसोबत असणार आहेत. या आंतरराष्ट्रीय मालिकेमुळे महाराष्ट्रातील युवा क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहे.
नाशिकच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी रेल्वे स्थानकावर नाशिक फिफ्टी बॉल्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री. पवन खोडे, खजिनदार श्री. तानाजी मते तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते. क्रीडा भारती नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फेही निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी फिफ्टी बॉल क्रिकेट फेडरेशनचे संस्थापक श्री. ईशान जैन, महाराष्ट्र संघटनेचे सचिव श्री. विजय टिपुगडे, अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गिरीश टोकसे तसेच महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि अहिल्यानगर संघटनेचे सचिव श्री. महेश जंगम यांनीही सर्व निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
नाशिकच्या तीन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्याने नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

