
सिन्नर प्रतिनिधी
तालुक्यातील मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात ” शिक्षण सन्मान सोहळा 2026 अभूतपूर्व वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान त्याचबरोबर समाजाप्रती असलेली कृतज्ञता,विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानदानाचेच काम न करता त्यांना सामाजिक भान,राष्ट्रनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच सुसंस्कार करण्याचे कार्य करणाऱ्या व खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचा उचित सन्मान करण्याचे काम,त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी,पुणे स्थित मनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच आयकॉन ग्रुचे संस्थापक रमण शिंदे ,मनेगाव येथील वृक्षमित्र परिवार व नूतन जवाहर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन तसेच स्वागतगीताने झाले.व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून दत्तात्रय गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके तसेच आयकॉन ग्रुपचे अध्यक्ष रमण शिंदे,वृक्षमित्र परिवाराचे अध्यक्ष रत्नाकर सोनवणे,सुरेश कपिले,पंडितराव सोनवणे,डॉ.अशोक सोनवणे, ॲड.संजय सोनवणे,नितीन शिंदे,ॲड.आण्णा सोनवणे,नितीन शिंदे,दत्ता पोटे,मुख्याध्यापिका मंजुषा आहेर,राजाराम मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील शिक्षिका अर्चना पाटील..चव्हाण यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान व समर्पण व कर्तृत्व,उल्लेखनीय कार्याबद्दल खालील शिक्षकांचा सन्मान पत्र, शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ तसेच हास्यवटी पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ज्ञानसाधना जीवनगौरव पुरस्कार: भाऊसाहेब कहांडळ, ज्ञान क्रांती जीवन गौरव पुरस्कार: गोविंद मोरे, जीवन गौरव रत्न पुरस्कार: जे.बी.पगार, ज्ञानदीप पुरस्कार: ललित सोनवणे, प्रेरणा रत्न पुरस्कार: शिरीष चौधरी, ज्ञानज्योती आदर्श शिक्षका पुरस्कार: प्रमिला शिंदे, आदर्श शिक्षिका पुरस्कार: मंजुषा ढोली, शिक्षक गौरव रत्न पुरस्कार: सुयोग पानसरे, प्रशांत बिरे राजू घोटेकर, हेमंत दराडे तसेच आदर्श बालसेविका गौरव पुरस्कार: मीना कर्डक
यावेळी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी स्वलिखित” विनोदातून प्रबोधन: हास्य वटी ” पुस्तक पुरस्कारार्थी शिक्षकांना भेट दिले. प्रमुख पाहुणे डॉ. भास्कर ढोके यांनी उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा समाज निश्चितच दखल घेऊन त्यांचा सन्मान करतो ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे शिक्षकांचे मनोबल वाढते,त्यांना प्रेरणा मिळते व आदर्श विद्यार्थी घडतात असे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी आपण नूतन जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी असून या शाळेतून माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडले व ते आज विविध क्षेत्रात उच्चपदावर तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत याचा सार्थ अभिमान आहे.यावेळी रमण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पुरस्कारार्थी गोविंद मोरे,जे.बी.पगार यांनी मनोगतातून आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला तसेच चांगले काम करण्याची पावती मिळते. आमच्या कार्याचा आयकॉन ग्रुप,वृक्षमित्र परिवार व नूतन जवाहर विद्यालयाने सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सूत्रसंचालन सुनील खैरनार,वृषाली खताळे यांनी केले.वैशाली वाजे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक वृंद,शालेय समितीचे पदाधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

