
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी : ता. 22: सिन्नर येथे विजयादशमीच्या मंगल पर्वानिमित्त श्री दशनाम गोसावी समाज संस्था, सिन्नर यांच्या वतीने शिवधाम समाधीभूमीत धर्मध्वजारोहण व पूर्वजांच्या समाधींचा पूजाविधी पारंपरिक धार्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून पूर्वजांच्या कार्याचे स्मरण, त्यांच्या प्रती आदरभाव आणि समाजाच्या धार्मिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ गोसावी होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दौलत गोसावी, सरचिटणीस वसंत गोसावी, सदस्य शरद गोसावी, माजी अध्यक्ष भानुदासपुरी गोसावी, रविंद्र गिरी, काशिनाथ गोसावी, ईश्वर गोसावी, सुभाष गोसावी, भिकन गोसावी आदी समाजबांधव उपस्थित होते.

प्रारंभी समाधीभूमीतील पूर्वजांच्या समाधींची स्वच्छता व साफसफाई करून पवित्र परिसराची निगा राखण्यात आली. त्यानंतर शिवमानसपूजेने पूर्वजांचे स्मरण करण्यात आले व विधिवत पंचोपचार पूजन करण्यात आले. पूर्वजांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
धर्मध्वजेचे पूजन संस्थेचे सरचिटणीस वसंत गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. पारंपरिक धार्मिक विधी, शिवस्तुती मंत्रपठण आणि शंखनाद यांच्या मंगलमय वातावरणात धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विजयादशमीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद करण्यात आले. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असल्याने या दिवसाचे औचित्य साधून समाजबांधवांनी एकत्र येत धार्मिक परंपरेचे पालन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमेकांना आपट्याची पाने अर्थात सोनं देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. पूर्वजांच्या समाधींचे पूजन, समाधीभूमीची स्वच्छता आणि धर्मध्वजेचे पूजन या उपक्रमांतून पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच भावी पिढीपर्यंत समाजाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त झाला. पूर्वजांच्या स्मृतींचे जतन, धार्मिक परंपरांचे संवर्धन आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करण्याचा संदेश देणारा हा विजयादशमीचा उपक्रम भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला.

