
नाशिक दि.२५- (बातमीदार) साहित्यामध्ये कविता हा सर्वात महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे. नाशिक शहर आणि जिल्हा हा परिवर्तनवादी चळवळीचा जिल्हा आहे. इथल्या सर्व कवींनी जिल्ह्याला समृद्ध केलेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्व कवींना या जुन्या जाणत्या समृद्ध कवींचा अभिमान असायला हवा. कविता लिहिताना कवितेकडे सजगदृष्टीने पाहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कविता ही कवितेशी प्रामाणिक असायला हवी. कविता लिहिणाऱ्याला सर्वप्रथम ती स्वतःलाच आवडायला हवी मग ती दुसऱ्याला आवडेल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले, ते नाशिक कवी संस्थेच्या काव्य कोजागिरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गेल्या २३ वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या नाशिक कवी या संस्थेच्यावतीने भावबंधन मंगल कार्यालयामध्ये काव्य कोजागिरीचे आयोजन करण्यात आलेले होते. या काव्य मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे अध्यक्ष श्री सुभाष सबनीस होते.
चंद्र तारे तुला तर नको पाहिजे
मागते कोणता ग्रहगोल तो
अरुण सोनवणेंच्या या गजलेली सगळ्यांची दाद मिळवली. तर
सांभाळून घ्या बाबा आता माहेराचे वाण नको
उपकारांनी तुमच्या झुकले सोन्याची ती खाण नको
तेजस्विनी कदम यांची ही गझल सगळ्यांना अंतर्मुख करून गेली. यावेळी पद्माकर देशपांडे, सुनील गायधनी, डॉ. लक्ष्मीकांत भट, माणिकराव गोडसे, संजय आहेर, तुकाराम ढिकले यांच्यासोबत सुमारे ६५ कवींनी कविता सादर केल्या. यावेळी कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, गिरणा गौरवचे सुरेश पवार, रवींद्र मालुंजकर, राजेंद्र उगले अरुण इंगळे पत्रकार नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती देव यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष अजिंक्य मगर यांनी मानले. चंद्राच्या प्रकाशात पावसाळी वातावरणामध्ये दुग्धपानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

