
मोहाडी: ( प्रतिनिधी ) भोंगा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा….., घे जगून मित्रा जन्म नाही सारखा सारखा …….अशा अनेक कवितांनी महाराष्ट्राला भुरळ घालणारे कवी अनंत राऊत यांनी मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री गोपाळकृष्ण देवराईला भेट देऊन देवराईच्या वृक्ष संवर्धन व वृक्ष जागृतीच्या कार्याची माहिती घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून गावातील तरुणांनी पर्यावरण विषयक केलेल्या कार्याचे कौतुक केले. देवराईत कवी अनंत राऊत यांनी वृक्षारोपण करून निसर्गाच्या सानिध्यात कविता गायन करून सर्वांशी संवाद साधला व जेव्हा मी नाशिकच्या परिसरात येत जाईल तेव्हा तेव्हा सह्याद्री देवराईला भेट देऊन मी लावलेल्या झाड वाढताना बघेन असे आश्वासन दिले. उन्हामध्ये गारवा देणारे वृक्ष हेच आपले खरे मित्र असून निसर्गाशी नातं जोडणारे व पर्यावरणा विषयक जागृती करणारे सह्याद्री देवराई चे कार्य असेच बहरत जाऊ अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष तुषार वाघ, दीपक जाधव सर , अमोल गणोरे, निखिल जाधव, चेतन नेवकर निशांत शिरसाठ, अमोल घोलप,अभिजित देशमुख सह देवराई सदस्य उपस्थित होते.

