
नांदगाव:- (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, संशोधनवृत्तीला चालना देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित नावीन्यपूर्ण प्रकल्प, प्रतिकृती आणि कार्यरत मॉडेल्स सादर करून आपल्या कल्पकतेची चुणूक दाखवली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे जेष्ठ सभासद रामनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विजय काकळीज, डॉ. गणेश चव्हाण, प्रा. मराठे सर, प्रा. आटोळे सर, प्राचार्य पुनम डी. मढे आदी मान्यवर उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजून घेण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील विविध वैज्ञानिक तत्त्वांचा आधार घेत पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, ऊर्जा बचत, सौरऊर्जा, पाणी शुद्धीकरण, प्रदूषण नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन जीवनातील विज्ञान अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांनी केवळ आपले ज्ञानच प्रदर्शित केले नाही, तर सामाजिक समस्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधण्याचाही प्रयत्न केला.
प्रदर्शनातील विविध प्रतिकृती आणि कार्यरत मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची संकल्पना, त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे, कार्यपद्धती आणि त्यांचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग यांची माहिती आत्मविश्वासाने समजावून सांगितली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून विषयाची समज, निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि सादरीकरण कौशल्य दिसून आले.
या वेळी शालेय प्राचार्या पूनम मढे म्हणाल्या की आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रयोगशील शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विज्ञान प्रदर्शनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची वृत्ती, तर्कशुद्ध विचार, समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा निर्माण होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची तसेच स्वतःच्या संशोधनवृत्तीला चालना देण्याची संधी मिळाली.
नांदगाव तालुका मविप्र संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या मान्यवर व उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध संकल्पनांचे आणि त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले. विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची विद्यार्थ्यांची हातोटी विशेष लक्षवेधी ठरली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच संघभावना, नियोजन, सहकार्य आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच अशा प्रयोगशील आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. होरायझन अकॅडमीच्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक विचारांना योग्य व्यासपीठ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा उपक्रमांमुळे भविष्यातील संशोधक, अभियंते आणि शास्त्रज्ञ घडण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात आला.
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला कृतीची जोड देणारा आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण करणारा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

