
नांदगाव:(प्रतिनिधी) — मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात दिवाळी निमित्त पणती रंगवून आकर्षक बनवण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या उपक्रमात इयत्ता ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेत कला शिक्षक विजय देशमुख व उपशिक्षिका मंगिता परदेशी, सुनिता निकम, शितल तासकर, वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना पणत्या वेगवेगळ्या रंगांनी व कलात्मक पद्धतीने कशा सजवाव्यात याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून विविध रंगांतील आकर्षक पणत्या तयार केल्या.
या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता अनाठायी खर्च टाळून कमी खर्चात व साधेपणाने आनंददायी दिवाळी कशी साजरी करावी, हे प्रत्येकाने शिकले पाहिजे.” स्वतःच्या हाताने पणती सजवून घर उजळवण्याचा हा उपक्रम पर्यावरणपूरक व फायदेशीर असल्याचे त्यांनी पटवून दिले.
विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे व कल्पकतेचे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

