
पुणे : उन्मेष साहित्य संस्थेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या गीत लेखन स्पर्धेत नागपूर येथील श्री. निलेश वासुदेव गणगे (निल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक गीता पत्की यांनी, तर तृतीय क्रमांक चारुशीला बिडवे यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण माननीय श्री. तुषार गोखले यांनी केले.
विजेत्या निलेश गणगे यांना संस्थेचे संस्थापक मा. डॉ. आनंद कुलकर्णी, सौ. आरुशी दाते आणि उपक्रम समन्वयक श्री. तुषार गोखले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ₹१,००१ रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
उन्मेष साहित्य संस्थेच्या या उपक्रमातून गीतलेखन क्षेत्रातील प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध होत असून, साहित्यिक आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळत आहे. या स्पर्धेतील यशाबद्दल निलेश गणगे यांचे साहित्यिक वर्तुळातून अभिनंदन होत आहे. तसेच सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले असून, परीक्षक श्री. तुषार गोखले यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

