
साकोरे, प्रतिनिधी : पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय, साकोरे येथे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्गाला नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी शैलेश टिळेकर व केंद्रप्रमुख सुकलाल महाजन यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यालयाची सर्वांगीण पाहणी करून शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.
भेटीदरम्यान शाळेची इमारत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सभागृहाचे सुरू असलेले बांधकाम, शैक्षणिक उपक्रम तसेच हिरवेगार मैदान व स्वच्छ, निसर्गरम्य परिसराची पाहणी करण्यात आली. विद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.
याच प्रसंगी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत पालक, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते पाच वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी शैलेश टिळेकर व केंद्रप्रमुख सुकलाल महाजन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत विद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

