
वासोळ:- दि. 9 प्रतिनिधी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.केदार एस.एस. हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांची भाषणे झाली. इयत्ता १० वी च्या जयश्री गवळी या विद्यार्थ्यींनीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रम प्रसंगी श्री.सावंत सर यांनी ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट हा दिवस ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. सन १९४२ मध्ये याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरुद्ध ऐतिहासिक ‘भारत छोडो’ (चले जाव) आंदोलन अधिकृतपणे तळागाळात सुरू केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या आंदोलनाने निर्णायक भूमिका बजावली. हा दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या स्मरणाचा आणि त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे अशी महत्वपूर्ण माहिती सांगत ऑगस्ट क्रांतीदिनाचे महत्व विषद केले. तसेच श्री.चौधरी आर.एस.यांनी आपल्या भाषणात जागतिक आदिवासी दिनाबद्दल विद्यार्थ्यांना माहीती सांगितली. त्यांनी भाषणात ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन करणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्राने १९९४ मध्ये ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून घोषित केला.आदिवासी समाजाच्या इतिहासाबाबत सांगायचे झाले तर स्वातंत्र्यलढ्यात भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे, क्रांतिवीर तंट्या भील, क्रांतिवीर उमाजी नाईक इत्यादी आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि अभिमानास्पद आहे. इंग्रजांचे जुलमी कायदे, जमीन बळकावणे आणि जंगल हक्कांवर गदा आणणाऱ्या धोरणांविरुद्ध या वीरांनी तीव्र संघर्ष केला.आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा, भाषा, इतिहास या सर्व गोष्टींचे जतन व संवर्धन केले तरच खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन आपण साजरा केला असे आपण म्हणू शकतो अशी माहिती सांगत आदिवासी दिनाचे महत्व महत्व विषद केले. अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री.केदार सर यांनी ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आहेर सर व आभार प्रदर्शन श्री.निकम एस.के यांनी केले.

