
नाशिक (प्रतिनिधी)
गुरुवर्य पंडित शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठान आयोजित ७३ वी ‘स्वरसाधना’ मासिक संगीत सभा अलिकडेच अतिशय उत्साहात व सांगीतिक वातावरणात पार पडली. नाशिकच्या ज्येष्ठ गायिका मृदुला देव आणि सुहास देव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तरुण तडफदार गायिका कुमारी रागिनी देवळे यांनी आपल्या दमदार व शास्त्रशुद्ध गायकीने श्रोत्यांची उत्स्फूर्त वाहवा मिळविली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक पंडित शंकरराव वैरागकर ,सुधा वैरागकर, ओंकार वैरागकर गायिका रागिणी देवळे, अथर्व वारे आणि संस्कार जानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन नाशिकचे सुप्रसिद्ध कवी राजेंद्र सोमवंशी यांनी केले, तर उत्तम ध्वनी व्यवस्थापनाची जबाबदारी राजेंद्र बुरसे यांनी सांभाळली.
राग भूपाली ते भैरवी: सुरेल गानमैफल
मैफलीची सुरुवात कुमारी रागिनी देवळे यांनी राग भूपालीने केली. यामध्ये त्यांनी विलंबित एकतालमधील ‘कैसे सुरझाऊँ एरी बीर’ ही रचना अतिशय पकडीने मांडली. त्यानंतर अद्धा तालातील ‘फुलवन सेज सवारूँ’ आणि द्रुत लयीतील तराना ‘तदरे तदानी दानी’ सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.
त्यानंतर राग देस मध्ये झूला ‘आओ री सहेली झौंका दीजो’ व होरी सादर करत वातावरणात वेगळाच रंग भरला. पुढे त्यांनी ‘देवघर्चे ज्ञात कुणाला’ हे अवीट गोडीचे नाट्यसंगीत व पंडित सुधाकर देवळे यांची रचना असलेले ‘मन की मन ही’ हे भजन अत्यंत भावपूर्ण रीतीने सादर केले. शेवटी ‘हे सुरान्नों चन्द्र व्हा’, राग काफीमधील टप्पा व नंतर सब सखिया समझा वोरी ही ठुमरी आणि भैरवीने ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ सादर करून सभेची मंगलमय सांगता केली.
“कलाकाराची जात ही परोपकारी असते… कारण कलाकार हा नेहमी समाजाला आनंद देण्याचे महान कार्य करत असतो.”
— पंडित शंकरराव वैरागकर (संस्थापक, वैरागकर संगीत प्रतिष्ठान)
कवी राजेंद्र सोमवंशी व तबला वादक रसिक कुलकर्णी यांचा विशेष सत्कार
कार्यक्रमाच्या मध्यंतरात गुणवंत कलाकार व साथसंगतकारांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी श्रीकांत कुलकर्णी, सतीश गवळी, सुजाता दास्ताने, पराग महाजन, राजेश गाढवे, पंकज वेल्हाणकर,अशोक सामानी, महेंद्र कोठारी,अनिल माहुलीकर,मोहिनी माहुलिकर, शाम अष्टेकर, ऐश्वऱ्या वारे यांसह अनेक रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विनोद धायडे, रोशन पानसरे, तन्मय खैरनार, अभिषेक म्हस्के, नेहा आहेर, रितिका गायकवाड, विजय चव्हाण ,अभिजीत धायडे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.

