
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी दुकळे यांनी पूजन केले तर संजय काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर स्काउट गाइडचे ध्वजारोहण स्काउट गाईड संस्कृती माने या विद्यार्थिनीने केले. संस्थेच्या अध्यक्षा कासूताई पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

प्रारंभी विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून देशभक्तिपर घोषणा दिल्या. विद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमात क्रीडाशिक्षक ललित निकम यांनी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रभक्तिपर गीतांवरील सामूहिक कवायतीला व राष्ट्रभक्तीपर समूहनृत्य, गीतांना व भाषणांना उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रसंगी प्रा. अमोल अहिरे यांनी उपस्थितांना कॉपीमुक्त परीक्षा, तंबाखू व नशामुक्तीची सामूहिक शपथ दिली. यावेळी क्रीडास्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

प्रास्ताविक नरेंद्र अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन पी. एम. थोरे व प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सरपंच वाल्याबाई पटांग्रे, प्राचार्य व्ही. डी. काळे, पर्यवेक्षक डी. के. जगताप, यांसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह बहुसंख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने समारोप झाला.

