महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक- कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त….

समाजातील अनेक व्यक्ती, कुटुंबं, समूह हे कमी – अधिक प्रमाणात भोंदूगिरीच्या आहारी जाताना दिसतात. त्यामागील काही प्रमुख कारणे अशी सांगता येतील — लोकांमध्ये असलेले अनेक बाबतीतील अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, परमार्थ कल्पनेच्या विचारांचा पगडा, व्यसने,दररोजच्या जगण्यातील विविध प्रकारच्या अंधश्रद्धा, दारिद्र्य, अस्वस्थता, असुरक्षितता, अनेक इच्छांची- कामनांची अतृप्तता, भविष्यात घडणाऱ्या घटनांची म्हणजे अदृष्टांची भीती,
लोभ.
खरंतर, या सर्व दुःखांची कारणे ही,बहुतेक वेळा
ह्या व्यवस्थेतूनच आलेली असतात.
शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, अशी अपेक्षा होती. पण शिक्षणातूनही वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिजे त्या प्रमाणात विकसित झालेला आढळत नाही.त्यामुळे अशिक्षतांपेक्षा सुशिक्षित लोकच जास्त अंधश्रद्धांना जवळ करताना, त्यांचा आधार घेताना आणि बहुतेक वेळा आहारी जाताना दिसतात.
वैज्ञानिक दृष्टिकोनाला जीवनमूल्यांची जोड दिली की व्यक्तीमध्ये विवेक निर्माण होतो. जसे निर्भयता हे एक जीवनमूल्य आहे. त्याला जर वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड दिली तर प्रत्येक घटनेमध्ये, प्रसंगा मध्ये माणसं निर्भयपणे वागू आणि जगू शकतात. जीवनाचा आनंद घेऊ शकतात.
तसेच स्वतःचा विवेक जागृत ठेवला तर माणसं अंधश्रद्धेकडे झुकत नाहीत, असा अनुभव आहे.
महाराष्ट्रातल्या संत समाज सुधारकांनी हाच विवेकी विचार सातत्याने समाजाला सांगितला आणि लोकांनी तो आचरावा यासाठी स्वतःचे आयुष्य झिजवले.
भारतीय संविधानातही वैज्ञानिक दृष्टिकोन हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे, असे नमूद आहे.
मात्र देव, धर्म, अध्यात्माच्या नावाखाली भोंदूबुवा लोकांच्या विविध प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून विवेकाशी विसंगत असे दैवी तोडगे, अंधश्रद्धा युक्त अनिष्ट, अघोरी, अमानुष उपाय लोकांना सुचवतात. भीती घालून आचारायला भाग पाडतात. या सर्वांचे देव-धर्म -अध्यात्म यांच्याशी नाते जोडून, त्यांच्या नावाने समर्थनही करतात आणि लोकांचे विविध प्रकारे सातत्याने आणि प्रचंड शोषण करतात.
भोंदूच्या नादाला लागून, आहारी गेल्यामुळे लोक मानसिक गुलामगिरीत गुरफटत जातात. ही मानसिक गुलामगिरी झुगारून देण्यासाठी लोकांनी निर्भय होऊन,स्वतःहून विवेक अंगीकारला पाहिजे. त्याचे जाणिवपूर्वक आचरण केले पाहिजे. म्हणजे अंधश्रद्धा व भोंदूगिरी मुक्त अशा विवेकी जीवनाचा लोक अनुभव व त्यातून मिळणारा आनंद घेऊ शकतील.
—--डॉ. टि. आर. गोराणे.
राज्य प्रधान सचिव.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

